प्रदक्षिणा मार्गाचे काम ठप्प
By Admin | Published: May 31, 2014 12:32 AM2014-05-31T00:32:12+5:302014-05-31T00:32:12+5:30
जिल्हाधिकार्यांची नोटीस कामही निकृष्ट : डांबरचे प्रमाण कमी असल्याने डस्टमुळे धुळीचे साम्राज्य
पंढरपूर : शहरातील प्रदक्षिणा मार्गाचे काम गेल्या १५ दिवसांपासून ठप्प असून ठेकेदाराने रस्त्यावर टाकलेली लहान खडी भाविकांच्या पायात बोचत असल्याने त्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी याबाबत ठेकेदाराला नोटिसा बजावून खुलासा मागविला आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून पहिल्यांदाच प्रदक्षिणा मार्गाचे काम हाती घेण्यात आले. कामाचा गाजावाजा करीत काम चालू झाले. सुमारे चार कि.मी. रस्त्याच्या कामासाठी सात कोटी रुपये खर्च होणार आहेत. या रस्त्याचे काम १५ दिवसांपूर्वी चालू झाले आहे. ठेकेदाराने या रस्त्यावर पूर्ण खडी टाकून त्यावर डस्ट टाकली आहे. ज्ञानेश्वर सभामंडप, नाथ चौक, चौफाळा, काळा मारुती चौक, लहूजी वस्ताद चौक या ठिकाणी खडी मोठ्या प्रमाणावर वर आली आहे. त्यात डांबरचे प्रमाणच नसल्याने खडी मोकळी असल्याने ती भाविकांच्या पायात रुतत आहे, तर डस्ट वाहनांमुळे नाकातोंडात जात असल्याने आरोग्यावर परिणाम होत आहे. या रस्त्यावर वाहने चालविण्यासाठी कसरत करावी लागत असून दुचाकी गाड्या खडीवरून घसरून पडत आहेत. दरम्यान, शुक्रवारी काही व्यापारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांना भेटले असून काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून या प्रदक्षिणा मार्गाचे काम हाती घेण्यात आले असून पुणे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी नियंत्रण करीत आहेत.
-----------------------
ठेकेदाराने काम बंद ठेवल्याने जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्याला चार पानी नोटीस बजावली आहे. प्रांताधिकारी व आपण या कामावर लक्ष ठेवून आहोत. दर्जेदार काम व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. - शंकर गोरे मुख्याधिकारी, नगरपालिका, पंढरपूर