केवळ ३५ दिवसात उजनी धरणातून उपसले तब्बल ४२ टक्के पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 04:39 PM2018-11-30T16:39:16+5:302018-11-30T16:40:54+5:30
उजनी ५० टक्क्यांवर : नियोजन कोलमडल्याने सुरू आहे वारेमाप उपसा
भीमानगर : सोलापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्यासाठी सुरू असलेल्या पाणी उपशामुळे उजनी धरणाचापाणीसाठा ५० टक्क्यांवर आला आहे. आॅगस्ट महिन्यात १११ टक्के भरलेली उजनी तीन महिन्यातच निम्म्यावर आली. केवळ ३५ दिवसात उजनीतून ४२ टक्के पाणी उपसा झाला आहे.
मंजूर आवर्तनानुसार भीमा नदी, कालवा व बोगद्यातून सीना नदीत पाणी सोडण्यात आले आहे. मागील महिनाभरापासून पाणी सुरू असल्याने दररोज पाण्याची पातळी घटत आहे. सोडलेले वारेमाप पाणी काटकसरीने वापरणे आवश्यक असताना ते होत नसल्याने अतिरिक्त पाणी सोडावे लागत असल्याचे सांगण्यात आले.
पदाधिकाºयांचा पाणी सोडण्यासाठी सातत्याने तगादा असल्याने पाणी बंद केले जात नाही. यामुळेच नोव्हेंबर महिन्यातच धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांवर आला आहे. धरणातून सोलापूरसह नदीकाठच्या गावांसाठी २४ आॅक्टोबर रोजी पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर कालव्यातून शेतीसाठी ३ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात आले. कालव्याच्या शेवटच्या भागाला मोजून पाणी दिले जात आहे; मात्र धरणाशेजारी व कालव्यालगत महिनाभरापासून पाणी वापर सुरू आहे. २४ आॅक्टोबर रोजी धरणात ९२.९० टक्के पाणीसाठा होता तर २८ नोव्हेंबर रोजी ५०.११ टक्के म्हणजे ३५ दिवसात धरणातील पाणीसाठा ४२ टक्क्याने कमी झाला.
मागील वर्षी याच दिवशी धरणात १०० टक्के पाणीसाठा होता. अशी धरण व्यवस्थापन विभागाकडून माहिती सांगण्यात आली. यंदा मात्र पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट झाली असून त्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रातील पुणे, सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. वारेमाप पाणी उपशामुळे धरणातील उपयुक्त पाणीसाठा जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात संपण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे येत्या उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. धरणातून सध्या कालवा विसर्ग ३२०० क्युसेक, भीमा-सीना बोगद्यातून एक हजार क्युसेक, सीना-माढा उपसा सिंचनला २८० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
उजनीची सद्यस्थिती
- च्एकूण पाणी पातळी -४९४.६०० मीटर
- च्एकूण पाणीसाठा -२६३९.०० दलघमी
- च्उपयुक्त पाणीसाठा -८३६.१९ दलघमी
- पाणी पातळी-५०.११ टक्के
- च्एकूण टीएमसी ९३.१८
- च्उपयुक्त टीएमसी २९.५३