जयंतीचे औचित्य; डोक्यावरील केशरचनेत साकारली शिवबा काशीद यांची प्रतिमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2022 10:56 AM2022-05-06T10:56:32+5:302022-05-06T10:56:39+5:30
पंढरीतील सलून कारागिराची किमया
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जिवाभावाच्या मावळ्यांच्या साथीने स्वराज्याचे तोरण बांधले. त्यातील एक असलेले शूरवीर मावळे शिवबा काशीद यांच्या जयंतीनिमित्त पंढरपुरातील माउली चव्हाण या कारागिराने डोक्यावरील केसामध्ये शिवबा काशीद यांची हुबेहूब प्रतिमा साकारली आहे.
पंढरपुरात माउली चव्हाण यांचे सलूनचे दुकान आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक महापुरुषांची चित्र केशरचनेमध्ये साकारली आहेत. त्यांची ही कला सोशल मीडिया, माध्यमांद्वारे सातासमुद्रापार पोहोचवली आहे. आजतागायत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा विविध महापुरुषांचे चित्रं सुबकपणे रेखाटली आहेत. गुरुवारीही त्यांनी शिवबा काशीद यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची प्रतिमा साकारून सर्वत्र वाहवा मिळवली आहे. पंढरीतील बसस्थानक परिसरातील त्याच्या दुकानात ही कला पाहण्यासाठी ग्राहकांची रेलचेल असते.
---
बालपणापासून आपण वेगळ काही तरी करायचं म्हणून मी आमचा पारंपरिक सलून व्यवसाय करताना केशरचनेत महापुरुषांची चित्रे साकारण्याचा छंद लागला. यासाठी स्वतंत्र असा ड्राईंगचा कोर्स केलेला नाही. आजवर छत्रपती शिवाजी महाराज, पांडुरंग, गणपती, मोबाईल टॉवरमुळे नामशेष होणाऱी चिमणी जगावी यासाठी प्रबोधनात्मक संदेश देण्यासाठी चिमणीचं चित्र केसात साकारले. आपल्या कलेचा समाजासाठी उपयोग व्हावा हीच माझी अपेक्षा आहे.
- माऊली चव्हाण, सलून व्यावसायिक, पंढरपूर.