दिव्यांगांना मोफत सेवा देणारे ज्योतिबा जाधव ठरले कोरोनाचे बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:23 AM2021-04-28T04:23:27+5:302021-04-28T04:23:27+5:30
निधनानंतरही पाच तास अंत्यविधीसाठी प्रतीक्षेत रहावे लागले. जाधव हे अक्कलकोट येथील समर्थनगर येथे राहात होते. ते रिक्षा मालक, चालक ...
निधनानंतरही पाच तास अंत्यविधीसाठी प्रतीक्षेत रहावे लागले. जाधव हे अक्कलकोट येथील समर्थनगर येथे राहात होते. ते रिक्षा मालक, चालक होते. सहा वर्षांपासून शहरी व ग्रामीण भागातील दिव्यांग लोकांना मोफत सेवा पुरवित होते. त्यांना सुरुवातीला कोरोनाची लक्षणे दिसल्याने ते मेडिकलमधून सर्दी, खोकला या आजाराच्या गोळ्या घेत राहिले. त्यामध्ये तब्बल आठवडा घालविला. नंतर त्रास होऊ लागल्याने घरातील लोकांनी अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून सोलापूर येथे एका खासगी रुग्णालयात गेले. सोमवारी उपचारासाठी दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असताना रविवारी सायंकाळी पाच वाजता हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला नाही. वेळेवर रुग्णवाहिका मिळाली नाही. प्रतीक्षेनंतर मिळाली तरी स्मशानभूमीत वेटिंग. यामुळे तब्बल पाच तासांनंतर सोलापूरचे राष्ट्रवादीचे युवक नेते संतोष पवार यांनी स्वतः येऊन सर्व प्रकारची तयारी करून अंत्यसंस्कार केले. यासाठी नातेवाईकांना फार मोठा त्रास सहन करावा लागला, अशी माहिती मृताच्या हितचिंतकानी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन मुले, भाऊ, आजी असा परिवार आहे.
----
दिव्यांगांप्रती आपुलकी
जाधव यांना दिव्यांगांबद्दल आपुलकी होती. सहा वर्षे त्यांनी दिवस - रात्र मोफत सेवा दिली. अनेक लोकांनी त्यांना ‘तुम्हाला कसं काय परवडते’ असे विचारल्यावर ते यात ‘मला फार मोठं समाधान आहे’, असे सांगायचे. अशा परोपकारी व्यक्तीच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.