काजल जाधव बनली वडशिंगेची ‘गीता फोगाट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 12:07 PM2019-03-09T12:07:51+5:302019-03-09T12:10:00+5:30
अमर गायकवाड माढा: मुलगा झाला नाही म्हणून नाराज झाल्यानंतर वडिलांनी आपल्या मुलींना कुस्तीत आणून जागतिक पातळीवर नाव गाजविणाºया हरियाणाच्या ...
अमर गायकवाड
माढा: मुलगा झाला नाही म्हणून नाराज झाल्यानंतर वडिलांनी आपल्या मुलींना कुस्तीत आणून जागतिक पातळीवर नाव गाजविणाºया हरियाणाच्या ‘गीता फोगाट’ची कहाणी ‘दंगल’ चित्रपटातून आमीर खानने दाखविली आहे. अगदी तशीच कथा घडलीय माढा तालुक्यात. वडशिंगेच्या या ‘गीता फोगाट’चे नाव आहे काजल जाधव. तिला प्रोत्साहन देणारे वडील अशोक जाधव यांची ही कथा आहे.
घरात दुसरी मुलगी झाली म्हणून अशोक जाधव नाराज होते. अगदी आपली पत्नी आणि दुसºया मुलीला पाहायलादेखील ते गेले नाहीत. शेवटी मामाने घरी आणून सोडले. नाराज झालेल्या वडिलांनी दोन वर्षे तिच्याबद्दल सहानुभूती दाखविली नाही. अशोक जाधव गावात पैलवानांना मार्गदर्शन करीत होते. रोज बाहेर जाणाºया वडिलांना कोठे जाता हे काजलने विचारून आपणही येणार असल्याचे सांगितले. वारंवार हट्ट धरल्यानंतर वडील तिला तालमीत घेऊन जायला तयार झाले. वडिलांनी ‘खेळशील का कुस्ती?’ असे म्हटल्यावर क्षणाचा विलंब न लावता तिने होकार दिला. वडिलांनीही तिला कुस्तीचे सारे डाव शिकविले.
बघता बघता वेगवेगळ्या आखाड्यात तिने कुस्त्या मारल्या. देशपातळीवरील कुस्तीमध्ये आपला दबदबा कायम राखण्याचे तिचे स्वप्न आता पूर्ण होताना दिसते आहे. पुणे येथे गेल्यावर्षीपासून चालू झालेल्या प्रो कुस्ती महाराष्ट्र लीग स्पर्धेत खेळण्यासाठी ती सराव करत असून, ती जागतिक कुस्तीपटू व्हायचे हे स्वप्न बाळगत त्यादृष्टीने सराव करीत आहे. शाकाहारी असलेल्या काजलला खुराकासाठी साधारणपणे महिन्याकाठी १५ हजार रुपयांचा खर्च येत असून, सफरचंद, चिकू, केळी, अंडी, बदाम, दही, दूध, पनीर, प्रोटिन यासारखा आहार ती घेते. ती मांसाहारी जेवण घेत नाही.
दूध विक्रीच्या माध्यमातून स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई-वडील यासाठी मेहनत घेत आहेत. म्हसवड येथील माणदेशी पतसंस्थेच्या माध्यमातून तिला दरमहा सात हजार रुपये मानधनदेखील मिळत आहे. वस्ताद अस्लम काझी व कोच अंकुश आरकिले, आबा नरोटे, श्रीहरी तरंगे, वडील अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करत आहे.
पदकांची कमाई
- वयाच्या १७ व्या वर्षात आपल्या वजनीगटात पुणे महापौर केसरी, सोलापूरचा जिजाऊ केसरी, सिद्धेश्वर केसरी, वाशिम केसरी होण्याचा मान तिने मिळविला. दिल्ली, औरंगाबाद, परभणी, तेलंगणा, हरियाणा, वर्धा या ठिकाणी दोन सुवर्ण, तीन रौप्य व चार कांस्य पदके मिळविली आहेत.