कुमठ्यात पुतण्याने केला काकाचा खून
By admin | Published: June 1, 2014 12:46 AM2014-06-01T00:46:24+5:302014-06-01T00:46:24+5:30
सोलापूर : पैशाच्या वादातून पुतण्याने धारदार शस्त्राने वार करून काकाचा खून केल्याची घटना शनिवारी सकाळी कुमठे येथील महालक्ष्मी मंदिरासमोर घडल्यामुळे खळबळ उडाली.
सोलापूर : पैशाच्या वादातून पुतण्याने धारदार शस्त्राने वार करून काकाचा खून केल्याची घटना शनिवारी सकाळी कुमठे येथील महालक्ष्मी मंदिरासमोर घडल्यामुळे खळबळ उडाली. शंकर घोडके (वय ५०) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मुलगा राहुल (२१) याने दिलेल्या फिर्यादीवरून त्याचा काका बब्रुवान धोेंडिबा घोडके व त्याची मुले सुधीर बब्रुवान घोडके, सुजीत बब्रुवान घोडके यांच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर हे शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमाराला कुमठे गावातील महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते मंदिरासमोरील पायरीवर बसले असताना मारेकर्यांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांचा पाय तोडण्यात आला. मान व पाठीवर वार झाल्यावर ते रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळल्यावर हल्लेखोर पळून गेले. या घटनेनंतर मंदिरासमोर गर्दी जमली. माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पो. नि. राजेश शिंगटे व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मंदिराच्या पायरीवर रक्ताचे थारोळे होते व भोवताली चपला पडल्या होत्या. सुरुवातीला मारेकरी कोण हे समजेना म्हणून पोलिसांनी श्वानपथकास पाचारण केले. श्वानपथक मंदिर परिसरात घुटमळले. नातेवाईक जमा झाल्यावर खरी हकिकत समोर आली. आरोपी बब्रुवान हा शंकर यांचा छोटा भाऊ आहे. बब्रुवानने शेतात ठिबक संच बसविण्यासाठी शंकर यांच्याकडून दीड लाख रुपये उसने घेतले होते. बरीच वर्षे झाली तरी तो पैसे परत देण्याचे नाव घेत नव्हता. शंकर यांनी तगादा लावल्यावर त्यांच्यात करार झाला होता; पण तरीही बब्रुवान पैसे देत नव्हता. दहा दिवसांपूर्वी पैशावरून भांडण झाल्यावर बब्रुवान पुण्याला निघून गेला होता. तो परत आल्याचे कळताच शंकर हे सकाळी साडेसहा वाजता पैसे मागण्यासाठी त्याच्या घरी गेले. त्यांच्यात वाद झाल्यावर ते मंदिराकडे गेले. त्यांच्या पाठलागावर आरोपी आले व त्यांनी धारदार शस्त्राने हल्ला चढविला. शंकर यांच्या पश्चात एक मुलगा, पाच मुली आहेत. घटनास्थळी उपायुक्त सुभाष बुरसे, अश्विनी सानप, पो. नि. संदीप गुरमे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.