नाट्य संमेलनावरून कानडी संघटनांची कोल्हेकुई
By admin | Published: December 12, 2014 10:58 PM2014-12-12T22:58:22+5:302014-12-12T23:33:36+5:30
सीमाप्रश्नाचा ठराव मांडण्यास विरोध
बेळगाव : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या माफीनाम्यानंतर संमेलनाचा वाद मिटतोय न मिटतोय तोच कानडी संघटनांची कोल्हेकुई सुरू झाली आहे. सीमाप्रश्नाचा ठराव मांडल्यास नाट्य संमेलनास परवानगी देऊ नये व संमेलन घेत असताना बेळगाव शहराचा ‘बेळगावी’ असा उल्लेख करावा, अशी मागणी करणारे निवेदन कानडी संघटनांनी बेळगावचे जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
अशोक चंदरगी यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी एन. जयराम यांची आज, शुक्रवारी भेट घेतली. या नाट्य संमेलनात सीमाप्रश्नच असेल तर त्याला परवानगी देऊ नये. याशिवाय कर्नाटक राज्य आणि कन्नड भाषेचा मान राखून हे नाट्य संमेलन बेळगावात झाले पाहिजे, असे कन्नड संघटनांचे मत आहे. या अगोदरच मोहन जोशी यांच्या वक्तव्याने बेळगाव येथील मराठी माणसांत तीव्र असंतोष आहे आणि त्यातच कानडी संघटनांनी कोल्हेकुई सुरू केल्याने नाट्यसंमेलनाबाबत समस्या निर्माण झाल्या आहेत.
कन्नड संघटनांच्या शिष्टमंडळात महापालिकेतील विरोधी गटनेते रमेश सोनटक्कीही सहभागी होते.
(प्रतिनिधी)