Kalicharan Maharaj on Raj Thackeray: “हिंदूसाठी काम करणाऱ्या राज ठाकरेंना पाठिंबा असणारच”; कालिचरण महाराज स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 05:32 PM2022-05-05T17:32:44+5:302022-05-05T17:33:55+5:30
Kalicharan Maharaj on Raj Thackeray: कोरेगाव-भीमा प्रकरणात भिडे गुरुजींना क्लीन चिट मिळणे हा हिंदुत्वाचा विजय आहे, असे कालिचरण महाराजाने म्हटले आहे.
सोलापूर: आताच्या घडीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे मशिदींवरील भोंग्याबाबतच्या भूमिकेमुळे चांगलेच चर्चेत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या भूमिकेवरून राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मात्र, यातच काही महिन्यांपूर्वी वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या कालिचरण महाराज यांनी राज ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे एकटेच मर्द आहेत. पुढील निवडणुकीत हिंदू काय करतात ते दिसेल, असे कालिचरण महाराजाने (Kalicharan Maharaj) म्हटले आहे.
जनतेच्या मनात हिंदू प्रेम आहे. त्यामुळे पुढच्या निवडणूकीत दिसेल हिंदू काय करतील. आम्ही हिंदूसाठी काम करतोय. त्यामुळे राज ठाकरे याच्या भोंग्याविरोधातील भूमिकेला आमचा पाठिंबा असल्याचे कालीचरण महाराजाने सोलापुरात सांगितले. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी कालीचरण महाराज सोलापुरात होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात कालिचरण महाराजाचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. या मंदिरात भक्तीगीते सादर करून कालिचरण महाराजाने भाविकांना मंत्रमुग्ध केले.
जो हिंदू हितकी बात करे... उसी को हम मतदान करेंगे...
जो हिंदू हितकी बात करे... उसी को हम मतदान करेंगे... अशीच आमची भूमिका आहे. हिंदूच्या हितासाठी बोलणाऱ्यालाच मतदान होईल, आम्ही त्याच्याच बाजूने उभे राहू. जनतेच्या मनात हिंदू प्रेम आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत दिसेल की हिंदू काय करतील असेही कालिचरम महाराजने म्हटले आहे. यावेळी त्याच्यासमवेत शेकडो भक्तगण उपस्थित होते.
दरम्यान, आमचा राज ठाकरे यांना पाठिंबा आहे. त्यांच्याविरोधात कुणी कितीही बोलत असले, तरी न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. तसेच धर्मजागरणाचे कर्तव्य आपण बजावत असल्याचे कालिचरण महाराजाने स्पष्ट केले. जे सत्तेत आहेत, त्यांनी हिंदू हिताची बाजू घेतली, तर त्यांनाही पाठिंबा असेल, असे कालिचरण महाराजांने नमूद केले. हिंदूंच्या हिताचे बोलणाऱ्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहणार असल्याचेही कालिचरण महाराजाने सांगितले. तसेच कोरेगाव-भीमा प्रकरणात भिडे गुरुजींना क्लीन चिट मिळणे हा हिंदुत्वाचा विजय आहे. कालिचरण महाराजाला हनुमान चालिसा म्हणायला सांगितली असता तो म्हणाला माझी हनुमान चालीसा पाठ नाही, मी तर कालिचा उपासक आहे.