कमलाभवानी देवी मंदिर ७ ऑक्टोबरपासून खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:24 AM2021-09-26T04:24:36+5:302021-09-26T04:24:36+5:30
करमाळा : राज्यातील मंदिरे ७ ऑक्टोबरपासून उघडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीदेवीचा माळ येथील कमलाभवानी मंदिरही ...
करमाळा : राज्यातील मंदिरे ७ ऑक्टोबरपासून उघडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीदेवीचा माळ येथील कमलाभवानी मंदिरही घटस्थापनेपासून भक्तांसाठी खुले होणार आहे. यामुळे भक्तांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.
कोरोनामुळेे मागील वर्षी नवरात्रोत्सव फक्त विश्वस्त व पुजारी यांच्या उपस्थितीत पार पडला होता. यावर्षीचा नवरात्रोत्सव भक्तांच्या उपस्थितीत परिपूर्ण होईल, असे जगदंबा देवस्थानचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे यांनी सांगितले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे बंद करण्यात आली होती. शासनाने सध्या लॉकडाऊन हटवले असून कोरोना नियंत्रणात असल्यामुळे मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे उघडली जाणार आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे कोरोनाचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्या ठिकाणी नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेह-यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकांचा वापर झाला पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेनुसार नियम पाळून भक्तांसाठी मंदिर खुले करणार आहोत.
-सोमनाथ चिवटे
अध्यक्ष, जगदंबा देवस्थान
---
फोटो : कमलाभवानी देवी