ढोलीबाजा लावला, गुलाब हार घातले; दोन किमी वरात काढून केले स्वागत
By काशिनाथ वाघमारे | Published: March 13, 2023 02:55 PM2023-03-13T14:55:17+5:302023-03-13T14:56:37+5:30
कन्याकुमारी सायकलवारी : प्रवासातला अनुभव केला कथन
सोलापूर : कन्याकुमारी सायकलवारी करणा-या दोन वृद्धांचे रविवारी सायंकाळी सोलापुरात २६ दिवसानंतर आगमन झाले. नीलमनगर वासियांनी गुलाब हार घालून बँजो लावून विठ्ठल कदम आणि श्रीशैल नवले या दोघांचे वाजत गाजत स्वागत केले. तसेच दोन किलो मीटर मिरवणूक काढली.
२६ दिवसांपूर्वी या दोघांनी सायकलवर कन्याकुमारी प्रवास सुरू केला होता. त्यांनी दररोज ताशी दहा किलो मीटर अंतर सायकलवर कापून दिवसभरात दहा तास प्रवास करायचे. सायंकाळी मंदिर वा लॉजवर उतरून मुक्काम करायचे. सोबत सायकलीस हवा मारण्यासाठी पंप आणि थकलेल्या पायांना चोळण्यासाठी तेल वापरायचे. एवढ्याशा तयारीवर त्यांनी २६ दिवसात २६०० किलो मीटर अंतर पार करुन कन्याकुमारीत स्वामी विवेकानंदांचे साहित्य जाणून घेतले.
दहा दिवसांपूर्वी ते कन्याकुमारीतून परत निघाले. शनिवारी विजयपुरात पोहोचले. रविवारी सायंकाळी सोलापुरात विजारपूर रोडवर सैफूल परिसरात त्यांचे आगमन झाले. येथून ठिकठिकाणी नातेवाईक थांबवून स्वागत केले. घरापर्यंत येईपर्यंत सहा किलो मीटर अंतरावर अनेक ठिकाणी त्यांचे औक्षण करुन प्रवासाबाबत विचारपूस केली.
नवले यांना भेटण्यासाठी त्यांच्या दोन बहिणी सांगली आणि धाराशिव येथून आल्या होत्या. त्यांनी औक्षण केले.
मंदिरापासून खांद्यावर आणले घरी
नीलम नगर परिसरात येताच नगर वासियांनी ढोली बाजा लावून स्वागत केले. जवळपास दोन किलो मीटर वाजत गाजत नेले. या परिसरात निंब्यव्वा देवीचे दर्शन घेतले. साठी पार केलेल्या विठ्ल कदम आणि श्रीशैल नवले यांना काही तरुणांनी खांद्यावर घेऊन जल्लोष करीत घरापर्यंत नेले.