मास्क नसल्याने बार्शीतील व्यापारी कपूरबा इलेक्ट्रॉनिक्स दुकान महिन्यासाठी केले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 12:26 PM2021-03-26T12:26:52+5:302021-03-26T12:27:29+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
बार्शी: बार्शी शहर व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोना वाढीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने व्यापारी व नागरिकांना सूचना करून देखील त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे.
गुरुवारी सायंकाळी शहरातील सोमवार पेठेतील कपूरबा इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे मालकाने स्वतः मास्क वापरले नाही तसेच विना मास्क असलेल्या ग्राहकांना दुकानांमध्ये प्रवेश दिला ,तसेच दुकानांमध्ये ग्राहकांना सॅनिटायझर देखील उपलब्ध करून दिले नाही, म्हणून संबंधित दुकानाच्या मालकावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हे दुकान महिनाभरासाठी सील केले आहे.
यापूर्वी देखील लॉकडाऊन दरम्यान याच दुकानदाराने जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशांचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित दुकानदाराने दुसऱ्या वेळेस हा गुन्हा केलेला असल्याने सदरचे दुकान हे पोलिसांनी 30 दिवसासाठी सील केले आहे. स्वतः शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाई मुळे व्यापारीआणि नागरिकांना शिस्त लागेल असे बोलले जात आहे.