कारंबा गाव कोरोनामुक्त; गावातील लोकांची पूर्वतपासणी ठरली फायद्याची
By Appasaheb.patil | Published: May 25, 2021 12:53 PM2021-05-25T12:53:30+5:302021-05-25T12:54:01+5:30
उत्तर सोलापूर तालुक्यातील पहिलेच गाव
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : शहरापासून अवघ्या १० ते १५ किलोमीटर अंतरावर असलेले कारंबा गाव...लोकसंख्या जेमतेम ५ हजाराच्या आसपास...कोरोना महामारी सुरू झाली अन् कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी शासनाने कडक नियम जाहीर केले... प्रत्येक नियमांचे कडक पालन केले...गावातील एकही व्यक्ती कोरोनाबाधित होऊ नये यासाठी सगळ्या गावाची काळजी घेतली. पूर्वतपासणी करून गावातील प्रत्येक इसमावर ग्रामपंचायत प्रशासन, लोकप्रतिनिधी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांनी कडक नजर ठेवून गावाला कोरोनापासून दूर ठेवण्यास यश मिळविले.
दरम्यान, २३ मार्च २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केला. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कारंबा गावातील सर्वच नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिवाय संसर्ग टाळण्यासाठी गावात औषधाची फवारणी, स्वच्छतेवर भर, सॅनिटायझर, मास्कचे प्रत्येक घरी वाटप केले. त्याचबरोबर आशा वर्करच्या माध्यमातून घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांची वैयक्तिक माहिती घेऊन रेकॉर्ड ठेवले. बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांची कसून तपासणी करून काही कालावधीसाठी त्या लोकांना क्वारंटाइन केले. कोरोनाबाबत काळजी घेण्यासंदर्भात जनजागृती, प्रचार व प्रसार केला.
कोरोना रुग्णसंख्येवर एक नजर...
कोरोनाच्या पहिल्या लाटेत गावात फक्त दोनच रुग्ण बाधित झाले होते. दुसरी लाट अचानक आली अन् गावातील २३ रुग्ण कोरोनाबाधित झाले. २३ पैकी १७ रुग्णांनी कोरोनावर मात केली अन् ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सद्यस्थितीला कारंबा गावात एकही कोरोनाबाधित अथवा उपचारार्थ नागरिक कोणत्याही रुग्णालयात नाही. कारंबा गाव कोरोनामुक्त आहे.
अख्खं गाव काळजी करतंय...
गावातील एखादा नागरिक, महिला किंवा युवक कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच व त्यांची संपूर्ण टीम त्या कोरोनाबाधित रुग्णांची आस्थेने विचारपूस करीत होती. फोनवरून, समक्ष किंवा त्यांच्या नातेवाइकांकडून त्या रुग्णास आवश्यक ती मदत करण्यास ग्रामपंचायतीने मागे-पुढे पाहिले नाही. गावातील प्रत्येक कुटुुंबाची ग्रामपंचायतीच्या संपूर्ण टीमने काळजी घेतली.
तिसऱ्या लाटेसाठी सज्ज
कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यादृष्टीने ग्रामपंचायतीने आतापासूनच तयारी करण्यास सुरुवात केली आहे. अंगणवाडीच्या माध्यमातून लहान मुलांचा सर्व्हे करून आजारी मुलांवर वेळेत उपचार कशा पद्धतीने करता येतील त्यादृष्टीने नियोजन करण्यात ग्रामपंचायत प्रशासन विचारविनिमय करीत आहे.
पहिल्या लाटेत गावात फक्त दोनच रुग्ण होते. तेही बरे होऊन खरे परतले. दुसरी लाट अचानक आल्याने गावातील रुग्णसंख्या वाढली; मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी केल्याने गाव लवकरच कोरोनामुक्त झाले. आता तिसरी लाट थोपविण्यासाठी उपाययोजना करीत आहोत. जात, धर्म, पंथ विसरून गावातील लोक संकटाच्या काळात माणुसकीच्या नात्याने एकमेकांच्या मदतीला धावून येत आहेत. हेच कारंबा कोराेनामुक्तीचे यश आहे.
- कौशल्या सुतार, सरपंच, कारंबा ग्रामपंचायत