कर्देहळ्ळी अख्खं गाव कंटेनमेंट झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:23 AM2021-04-20T04:23:33+5:302021-04-20T04:23:33+5:30
गेल्या तीन महिन्यात कर्देहळ्ळी गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. आत्तापर्यंत केलेल्या तपासणीत या एकाच गावात ३१ कोरोना ...
गेल्या तीन महिन्यात कर्देहळ्ळी गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. आत्तापर्यंत केलेल्या तपासणीत या एकाच गावात ३१ कोरोना रुग्ण आढळले आहेत.
बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. प्रशासनाची चिंता देखील वाढली आहे. सोमवारी तहसीलदार अमोल कुंभार, गटविकास अधिकारी राहुल देसाई आणि तालुका आरोग्य अधिकारी गायकवाड यांनी ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात आल्या.
------
का गरज भासली कंटेनमेंट झोन जाहीर करण्याची ?
कर्देहळ्ळी गावात सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या आठवडाभरात रोजच या संख्येत भर पडत चालली. गाव सोलापूरपासून जवळ असल्याने ग्रामस्थांचे दैनंदिन व्यवहार सोलापूर शहरात होत असतात. रोज शेकडो ग्रामस्थ शहरात ये जा करतात. त्यामुळे त्यांचा शहराशी होणारा संपर्क टाळण्यासाठी प्रशासनाने गाव कंटेनमेंट झोन जाहीर करण्याचा निर्णय घेतला.
--------
अशी असेल कंटेनमेंट झोन व्यवस्था
कंटेनमेंट झोन मधील सर्वच कुटुंबांचे दैनंदिन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी १४ दिवस नित्य तपासणी करतील. संशयितांची कोविड चाचणी करण्यात येणार आहे. चाचणीनंतर कोरोना संसर्ग झाल्याचे दिसून आले तर त्यांचे विलगीकरण करण्यात येणार आहे. गंभीर रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले जाईल. गरजूंना लसीकरण करण्यात येणार आहे .
--------
प्रतिबंधित क्षेत्र
संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या हालचालीवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. त्यांना गावातून बाहेर जाता येणार नाही. या काळात अन्य व्यक्तींना कर्देहळ्ळी गावात प्रवेश करता येणार नाही.