करकंब सर्वांत मोठी, तर वालवड लहान ग्रामपंचायत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:21 AM2020-12-29T04:21:56+5:302020-12-29T04:21:56+5:30
सोलापूर : जिल्ह्यामध्ये करकंब, ता. पंढरपूर ही सर्वांत मोठी सदस्य संख्या असणारी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायती निवडणुकीत सख्खे भाऊच ...
सोलापूर : जिल्ह्यामध्ये करकंब, ता. पंढरपूर ही सर्वांत मोठी सदस्य संख्या असणारी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायती निवडणुकीत सख्खे भाऊच आमने-सामने रिंगणात आहेत. या दोघा बंधूंचे पॅनल आहेत.
करकंब ही एकूण १७ सदस्य संख्या असणारी ग्रामपंचायत आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. आजपर्यंत करकंबमध्ये श्री विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवार यांच्यात प्रमुख लढत होत होत्या, पण यावेळी पांडुरंग साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष नरसाप्पा देशमुख आणि माजी सरपंच मारुती देशमुख या दोन सख्ख्या बंधूंच्या गटात होताना दिसत आहे. त्यांना शह देण्यासाठी काही तरुण तुर्क, ज्येष्ठ मंडळींच्या मदतीने तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी चाचपणी सुरू आहे.
उत्तर बार्शीच्या टोकाला बालाघाट डोंगररागांच्या पायथ्याशी असलेल्या वालवडमध्ये २० वर्षांपासून ॲड. सुभाष जाधवर विरुद्ध सुधीर जाधवर या भावकीतील पारंपरिक विरोधी गटात लढत होत आहे. सात सदस्य संख्या असलेली ही छोटी ग्रामपंचायत असली तरी चुरशीची लढत होत असल्याचे तालुकावासीयांना पाहावयास मिळते. दोन्ही जाधवर हे मातब्बर म्हणून ओळखले जातात. सध्या ॲड. सुभाष जाधवर गटाची सत्ता आहे. या दोन्ही गटांनी यावेळी तयारी केली असताना गावात वंचित आघाडीही निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी करीत असल्याचे दिसून येते.