मोठी बातमी! कर्नाटक करतयं सोलापूरकरांच्या हक्काचं दररोज २१५ एमएलडी पाण्याची चोरी
By Appasaheb.patil | Published: March 26, 2023 03:17 PM2023-03-26T15:17:29+5:302023-03-26T15:18:11+5:30
सोलापूर शहराला औज धरणातून आलेल्या पाण्याच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो.
सोलापूर - कर्नाटक सरकार दररोज औज बंधाऱ्यातून चक्क २१५ एमएलडी पाणी उपसा करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल तयार केला असून तो अहवाल लवकरच लवादाकडे सादर करून संबंधितांविरोधात तक्रार करण्यात येणार असल्याचेही सांगितले.
सोलापूर शहराला औज धरणातून आलेल्या पाण्याच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. दरवर्षी पाच वेळा उजनी धरणातून सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पाणी सोडले जाते. मात्र, कर्नाटकातील लोक पाणी उपसा करीत असल्यामुळे शहरात येणारे पाणी कमी प्रमाणात येत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. औज धरण परिसरात कर्नाटकचे लोक ९ तलाव भरण्यासाठी १०० एमएलडी पाणी घेतात. शिवाय साखर कारखाना, इंडीसह सात गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठीही पाणी उपसा केला जातो. त्यामुळे दररोज कर्नाटक २१५ एमएलडी पाणी उपसा करीत असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
महापालिका औज बंधाऱ्यातून जेवढे पाणी घेते तेवढ्या प्रमाणात पाटबंधारे विभागाकडे पैसे भरते. साधारण वर्षाला अडीच कोटी रूपये महापालिका पाण्यासाठी खर्च करीत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कर्नाटक सरकार पाणी घेते. मात्र, पैसे देते की नाही याबाबत कल्पना नसल्याचेही सांगण्यात आले.