वर्दीतले कीर्तनकार करणार समाज प्रबोधन; गाव तंटामुक्त करण्याचा जागरही करणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 01:17 PM2019-07-04T13:17:39+5:302019-07-04T13:19:54+5:30
सलग १० वर्षांची सेवा; पालखीच्या मुक्कामी कलेच्या माध्यमातून केली जाते जनजागृती
संताजी शिंदे
सोलापूर :
हेचि थोर भक्ती, आवडती देवा।
संकल्पाची माया, संसारी ठेविले।।
अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान।
संत तुकारामांच्या अभंगातून सांगण्यात आलेल्या संसाराच्या व्याख्येप्रमाणे माणसाने आपले जीवन कसे जगावे, सध्यस्थिती काय आहे? काय केले पाहिजे अन् कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचे सुंदर प्रबोधन करण्यासाठी, वर्दीतल्या कीर्तनकाराचा रथ पंढरपूरच्या वारीसाठी सज्ज झाला आहे. प्रबोधन करण्याचे यंदाचे हे दहावे वर्ष आहे, संत तुकाराम महाराज अन् संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा ज्या ठिकाणी मुक्काम असतो, तेथे वर्दीतला कीर्तनकार आपली जनजागृतीपर कला सादर करतो.
सोलापूर ग्रामीण मुख्यालयातील पाच पोलीस कर्मचाºयांचे पथक प्रबोधनासाठी जात असतात. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा रथ तयार करण्यात आला आहे. पोलीस व्हॅन असलेल्या रथामध्ये समाजातील ज्वलंत प्रश्नावर प्रकाश टाकणारे डिजिटल बॅनर तयार करण्यात आले आहेत.
रथाचे नेतृत्व निवृत्त सहायक फौजदार विठ्ठल माने हे करीत आहेत. सोबत ग्रामीण पोलीस दलातील बॅन्ड मेजर रमेश ठोंबरे, पोलीस नाईक अतुल सुरवसे, पोलीस हवालदार सुरेश माने, पोलीस नाईक सुरेश कांबळे यांचा समावेश आहे. जनजागृतीमध्ये समाजातील वाढती व्यसनाधीनता यावर प्रबोधन केले जाते. व्यसनापासून दूर राहण्यासाठी त्याचे फायदे व तोटे सांगितले जातात. समाजातील वाढती स्त्री-भ्रूणहत्या, बेकायदेशीर सावकारी, अवैध धंदे, झाडे लावा झाडे जगवा अभियानाचे महत्त्व, पती-पत्नीचा वाद मिटवणे, वृद्धापकाळात आई-वडिलांना जी मुले सांभाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाते. अशा विविध विषयावर प्रबोधन केले जाते.
पालखी मार्गावर ज्या ठिकाणी विसावा असतो, त्या ठिकाणी हा रथ थांबून सवाद्य आपली कला सादर करतो. गावातील लोक आवर्जून वर्दीतील कीर्तन ऐकण्यासाठी जमत असतात. प्रत्येक वर्षी नवनवीन संकल्पना घेऊन हे वर्दीतील कलाकार आपली कला सादर करतात. गावकरी वर्दीतील कलाकारांचे समाज प्रबोधनावर आधारित कीर्तन ऐकण्यासाठी वाट पाहत असतात. या वर्दीतील कीर्तनकारांनाही सध्या पंढरपूरच्या वारीचे वेध लागले आहेत.
५ जुलै रोजी होणार प्रस्थान...
- सोलापूर पोलीस ग्रामीण दलाच्या वतीने २००९ पासून प्रबोधन रथाची सुरुवात केली आहे. यंदाच्या वर्षी या प्रबोधन रथाला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. विठ्ठल माने हे रथाचे नेतृत्व करतात, ते २०१७ साली सेवानिवृत्त झाले तरी वारीसाठी आपला वेळ देतात. या रथाचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी कौतुक केले होते. आजवरही सेवानिवृत्त सहायक फौजदार व ह.भ.प. विठ्ठल महाराज माने हे ही परंपरा चालवत आहेत. ५ जुलै रोजी रथाचे धर्मपुरी येथे प्रस्थान होणार आहे. ६ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सोलापुरात आगमन होईल. या पालखी सोबत रथ असणार आहे. ७ जुलै रोजी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सोलापुरात आगमन होईल त्यांच्याही सोबत हा रथ असणार आहे. वेळेचे नियोजन करून आलटून पालटून दोन्ही पालख्यांमध्ये हा प्रबोधन रथ जनजागृतीचे काम करणार आहे. १२ जुलैची वारी संपल्यानंतर १४ जुलै रोजी हा रथ सोलापुरात येणार आहे.
शब्द हे शस्त्रासारखे असतात, त्यामुळे माणसाच्या मनावर ८० टक्के परिणाम होत असतो. गावाच्या ठिकाणी प्रबोधन करत असताना अपप्रवृत्तीवर प्रकाश टाकत असतो. सत्य घटनेवर प्रबोधन करत असतो. लोक रडतात त्यांना सत्याची जाणीव होते. १०० ते २०० लोकांमध्ये केवळ १० लोकांचे जरी मनपरिवर्तन झाले तरी पांडुरंगाच्या भक्तीचे समाधान झाले असे समजेन.
-विठ्ठल माने, निवृत्त सहायक फौजदार