‘एसटी’ महामंडळाची कार्तिकी वारी हुकली; काही वारकरही दर्शनाला मुकले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 02:57 PM2021-11-18T14:57:05+5:302021-11-18T14:58:01+5:30
पंढरीतील संख्याही घटली : कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका
सोलापूर : मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सर्व देवस्थान बंद ठेवण्यात आले होते. यामुळे पंढरपूरची यात्रा भरू शकली नव्हती. पण कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे प्रशासनाने कार्तिकी यात्रा भरण्यास परवानगी दिल्यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पण त्याच काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक वारकऱ्यांना कार्तिकीच्या यात्रेला पोहोचण्यास अडचणी आल्या. यामुळे अनेक वारकऱ्यांची कार्तिकीची वारी हुकली, पण पुढे येणाऱ्या आळंदीची वारी हुकू नये यासाठी वारीपर्यंत प्रशासनाने एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन कार्तिकी एकादशीला राज्य नाही, तर देशभरातून लाखो भाविक चालत, एसटीने, मिळेल त्या वाहनाने पंढरपूरकडे येतात. एसटीचे तिकीट सर्वसामान्यांना परवडण्यासारखे असल्यामुळे अनेक वारकरीही एसटीने प्रवास करण्यास पसंती देतात. पण यंदा एसटी गाड्या बंद असल्यामुळे खासगी वाहनांनी तिकीट दरात मोठी वाढ केली. यामुळे वारकऱ्यांना हे दर परवडणारे नसल्यामुळे अनेक वारकऱ्यांनी आपल्या कामातच विठ्ठल शोधले. यामुळे त्यांना पंढरपुराला जावू शकले नाहीत. यामुळे अनेकांनी खंतही व्यक्त केली. पण काही दिवसांत आलेल्या आळंदीच्या वारीपर्यंत तरी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांचा सरकारने सकारात्मक विचार करून एसटी सेवा सुरळीत करावी, अशी मागणी वारकऱ्यांनी केली.
एसटीला वारी काळात दीड कोटीचा तोटा
एसटीचे उत्पन्न प्रवाशांवर अवलंबून असते. पण विविध गावांच्या यात्रा, जत्रा, वारी यांमधून प्रवाशांची संख्या वाढत असते. यामुळे या काळात एसटीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढते. पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी एसटीने प्रवास करीत असतात. मागील यात्रेच्या व दिवाळीच्या वेळी एसटीला जवळपास एक ते दीड कोटीचे उत्पन्न मिळाले होते. पण यंदा दिवाळी आणि कार्तिकी यात्रा उत्पन्न बुडाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
वारकऱ्यांसाठी पंढरपूर खुलं झालं याचं प्रत्येक वारकऱ्यांना आनंदही झाला. पण लालपरीने येता आलं नाही याचं दुःखही झालं. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे. त्यांच्याशिवाय वारकऱ्यांची वारी पूर्ण होणार नाही. यामुळे प्रशासनाने विशेष लक्ष देऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. जेणेकरून २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान आळंदी येथे होणाऱ्या यात्रेमध्ये एसटी गाड्यांमधून वारकऱ्यांना जाता येईल.
- भागवत महाराज चवरे
शेतकरी कुटुंबातील वारकऱ्यांना एसटीने जाणे सोयिस्कर असते. अशा वारकऱ्यांना खासगी वाहन करून जाणे परवडत नसल्यामुळे अनेकांना पंढरपुराला जाता आले नाही. यामुळे अनेक वारकऱ्यांकडून यंदा खंत व्यक्त करण्यात आली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा आहे, पण त्यांनी वारकऱ्यांच्या सोईकडेही लक्ष द्यावे.
बळिराम जांभळे, वारकरी