कार्तिक वारी ; पंढरपुरात सहा लाख भाविक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 07:37 PM2018-11-18T19:37:03+5:302018-11-18T19:39:17+5:30
पवित्र स्नानासाठी चंद्रभागेत भाविकांची गर्दी
पंढरपूर : कार्तिकी यात्रा सोहळ्याला सावळ्या विठुरायाच्या दर्शन घेण्यासाठी पंढरीत रविवारी सहा लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत़ पैकी साडेतीन लाख भाविकांनी पांडुरंगाचे दर्शन घेतल्याचे मंदिर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले़ याशिवाय चंद्रभागा नदीपात्रात पवित्र स्नान करण्यासाठी चंद्रभागेत भाविकांनी दाटी केली होती.
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या वर्षभरातील चार पैकी आषाढीनंतरची कार्तिकी यात्रा ही मोठी यात्रा असते़ त्यामुळे या यात्रेतही देशभराच्या कानाकोपºयातून भाविक दाखल होतात़ विशेषत: कार्तिक वारीसाठी कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातील भाविकांची संख्या जास्त असते़ कार्तिकी यात्रेदरम्यान दशमी दिवशीच पंढरीत ६ लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्ग, शिवाजी चौक, दर्शनरांग, चंद्रभागा वाळवंट, वाखरीतील बाजार तळ या भाविकांची मोठी गर्दी दिसून येते.
विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेला प्रत्येक भाविक दर्शन घेण्यापूर्वी चंद्रभागेत पवित्र स्नान करत असतो. यामुळे दशमी दिवशीच चंद्रभागेच्या ११ पैकी ९ घाटांवर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती.
चंद्रभागेत स्नान करण्यासाठी आलेले भाविक आनंदाने नदीपात्रात नौका विहार करीत असताना दिसून आले
- भाविकांना मोफत खिचडी वाटप
विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो भाविक रांगेत थांबतात. रांगेत थांबलेल्या भाविकांना रांग सोडून बाहेर गेल्यास पुन्हा रांगेत त्याच ठिकाणी उभे राहणे कठीण होते. त्यामुळे दर्शन रांगेतील भाविक अन्नपाण्याविना थांबलेले असतात़ त्यांची ही गैरसोय लक्षात घेऊन मंदिर समितीच्या वतीने पूर्वी चहा, स्वच्छ पाण्याची सोय केली जात होती, मात्र यंदा प्रथमच खिचडीची सोय करण्यात आली आहे़ शिवाय त्यानंतर दर्शन रांगेतच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती़ या उपक्रमाचे भाविकांनी स्वागत केले
- साडेतीन लाख भाविकांनी घेतले दर्शन
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांच्या दर्शन रांगेसाठी उभारण्यात आलेल्या १० पत्राशेड पैकी सात पत्राशेड रात्री ३ वाजताच भरले होते़ दिवसभरात सर्व पत्राशेड भरल्याचे दिसून आले़ दर्शन रांगेत थांबलेल्या भाविकांना मुखदर्शन घेण्यासाठी १४ ते १५ तासांचा कालावधी लागत होता. दशमी दिवशी दिवसभरात साडेतीन लाख भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी चे मुखदर्शन व पद दर्शन घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत दर्शन रांगेत ४५ हजारांपेक्षा जास्त भाविक थांबल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.