कार्तिकीत नोटाबंदी, आषाढीत जीएसटी, यात्रेतही पंढरीच्या भाविकांना बसणार फटका
By admin | Published: July 1, 2017 11:41 AM2017-07-01T11:41:32+5:302017-07-01T11:41:32+5:30
आॅनलाइन लोकमत सोलापूर
आॅनलाइन लोकमत सोलापूर
पंढरपूर दि १ : शासनाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून जीएसटी कर प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतल्याने पंढरीत येणाऱ्या लाखो भाविकांना त्याचा फटका बसणार आहे. पितळी, चांदीच्या मूर्ती व महागडी वस्त्रे आणि मौल्यवान वस्तू खरेदी करणाऱ्या भाविकांना ३ टक्के वाढीव दराने किंमत मोजावी लागणार आहे. कार्तिकी यात्रेमध्ये नोटाबंदीचा तर आषाढीमध्ये जीएसटीचा फटका बसणार असल्याने वारकरी धास्तावला आहे.
आषाढी यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरीच्या दिशेने आगेकूच करीत आहेत. शहरातील रस्त्यावर भाविकांची गर्दी जाणवू लागली आहे. पंढरीला आल्यानंतर प्रासादिक वस्तू, देवतांचे फोटो आणि संस्मरणीय अशी एखादी वस्तू घेण्याकडे भाविकांचा ओढा असतो. संस्मरणीय वस्तूमध्ये विठ्ठल-रुक्मिणीच्या सोने, चांदीच्या अथवा पितळी व पंचधातूच्या मूर्ती घेण्यावर भाविकांचा भर असतो.
भारत सरकारने जीएसटी कर प्रणाली लागू केल्यामुळे आता ग्राहकांना थेट खरेदी कर भरावा लागणार आहे. साहजिकच त्यामुळे वस्तूंच्या किंमती ३ टक्क्यांपासून १७ टक्क्यांपर्यंत वाढणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जीएसटीची रक्कम स्वत:च्या खिशातून भरण्याचा भुर्दंड भाविकांना सहन करावा लागणार आहे.
-------------------------------
भाविकांमधून उलट-सुलट चर्चा
कार्तिकी यात्रेच्या दरम्यान ऐन यात्रा कालावधीमध्ये केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात भरलेल्या जनावरांच्या बाजारात आर्थिक उलाढाल मंदावली होती. ऐनवेळी बॅँकांमधून नोटा उपलब्ध न झाल्यामुळे जनावरांच्या बाजारात खरेदी केलेली जनावरे रद्द करून व्यापाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते. आता तीच परिस्थितीत आषाढीत जीएसटी कर प्रणाली लागू केल्यामुळे होणार असल्याने भाविकांमधून जीएसटी कर प्रणालीबद्दल उलट-सुलट चर्चा ऐकू येत आहे.