काशी पीठाचे मानाचे चार पुरस्कार प्रदान
By Admin | Published: June 8, 2014 01:09 AM2014-06-08T01:09:22+5:302014-06-08T01:09:22+5:30
काशी, उज्जैन जगद्गुरूंचे आशीर्वचन : शिवदारेंकडून लाख रुपयांची देणगी
सोलापूर : काशी पीठातर्फे देण्यात येणाऱ्या मानाच्या चार पुरस्कारांचे वितरण शनिवारी सायंकाळी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात काशी जगद्गुरू पूज्य डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य आणि उज्जैनचे जगद्गुरू पूज्य श्री सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामीजींच्या हस्ते आणि वळसंगच्या स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. दोन्ही जगद्गुरुंनी आपल्या आशीर्वचनात उपस्थितांना सामाजिक बांधिलकीच्या धाग्यात जुंपण्याचा सल्ला दिला.
डॉ. चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार आजरा (कोल्हापूर) येथील प्रा. डॉ. शिवशंकर उपासे, वेदमूर्ती वीरसंगय्या स्वामी आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. स्वर्णलता भिशीकर, वेदमूर्ती बंडय्या मठपती समाजसेवा पुरस्कार पंढरपूरच्या शकुंतला टेकाडे तर विठाबाई देवाप्पा पसारकर कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर यांना प्रदान करण्यात आला.
शकुंतला टेकाडे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे चिरंजीव डॉ. अशोक टेकाडे यांनी पुरस्कार स्वीकारला. रोख १० हजार रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. काशी पीठाचे कार्य पाहून राजशेखर शिवदारे यांनी एक लाख रुपयांची देणगी देत असल्याचे जाहीर केले.
प्रारंभी सुविद्या प्रकाशनचे बाबुराव मैंदर्गीकर यांनी स्वागत केले. त्यानंतर शे. दे. पसारकररचित श्रीसिद्धांतशिखामणी अभंगगाथा या ग्रंथाचे प्रकाशनही दोन्ही जगद्गुरुंच्या हस्ते करण्यात आले. शे. दे. पसारकर यांनी आपल्या मनोगतात ग्रंथावर प्रकाश टाकला. पुरस्कारप्राप्त मंडळींनी पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना काशी पीठाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सूत्रसंचालन रेवणसिद्ध वाडकर यांनी केले तर डॉ. अनिल सर्जे यांनी आभार मानले. यावेळी वेदमूर्ती बसवराज शास्त्री, सिद्धेश्वर बँकेचे अध्यक्ष सुभाष मुनाळे, सामाजिक कार्यकर्ते जयनारायण भुतडा, हत्तुरे प्रशालेचे मुख्याध्यापक वैजिनाथ हत्तुरे, काशिनाथ सर्जे, सिद्धय्या स्वामी, पद्माकर कुलकर्णी, शिवशरण कंबाळेमठ, शांता मरगूर आदी उपस्थित होते.
------------------------------------------
शिक्षणाला गती देणारे काशी पीठ
केवळ वीरशैव समाजच नव्हे तर इतर समाजातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणाला गती मिळावी, ही मुले उच्च पदावर जावीत, केवळ ही भावना उराशी बाळगून जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य यांनी निवडण्यात आलेल्या गुणी विद्यार्थ्याला दरमहा १ हजार रुपयांचे विद्यावेतन (शिष्यवृती) दिले जाते. समाजातील दानशूर, प्रतिष्ठित व्यक्तींकडून आलेल्या देणग्या बँकेत ठेवल्या जातात. त्या रकमांच्या व्याजावर शिष्यवृती देण्याचा चांगला प्रयोग आजपर्यंत डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य यशस्वीपणे राबवत आहेत.
---------------------------------
टेकाडे कुटुंबीयांकडून ५१ हजारांची देणगी
काशी पीठाचा वेदमूर्ती बंडय्या मठपती समाजसेवा पुरस्कार पंढरपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या शकुंतला टेकाडे यांना जाहीर झाला. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या पुरस्कार वितरण सोहळ्याला येऊ शकल्या नाहीत. त्यांच्या वतीने तो पुरस्कार त्यांचे डॉक्टर असलेले पुत्र अशोक टेकाडे यांनी स्वीकारला. कार्यक्रमस्थळीच डॉ. अशोक टेकाडे यांना मातेचा भ्रमणध्वनी आला. मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेत ४१ हजार रुपयांची भर घालून ५१ हजारांची देणगी काशी पीठास देण्यास आई शकुंतलाबाई यांचा निरोप असल्याचे त्यांनी सांगितले.
------------------
प्रज्ञा पुरस्कार लांबणीवर
काशी पीठातर्फे देण्यात येणाऱ्या पाच मानाच्या पुरस्कारांपैकी चारच पुरस्कारांचे वितरण झाले. एम. एस्सी. परीक्षेत गणित विषयात सोलापूर विद्यापीठात प्रथम येणाऱ्या गुणवंताला वेदमूर्ती सदाशिव स्वामी प्रज्ञा पुरस्कार दिला जातो. मात्र अद्याप निकाल न लागल्याने या पुरस्काराचे वितरण नंतर होणार असल्याचे सूत्रसंचालन करणारे रेवणसिद्ध वाडकर यांनी जाहीर केले.