तुळजापूर ते शिंगणापूर महामार्ग व्हावा म्हणून काढली कावडयात्रा
By काशिनाथ वाघमारे | Published: October 17, 2023 04:44 PM2023-10-17T16:44:30+5:302023-10-17T16:45:02+5:30
तुळजापूर येथून दुपारी दोन वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत कावड यात्रा काढली. या कावड यात्रेस अनेकांनी सहभाग नोंदवला.
सोलापूर : छत्रपती शिवरायांचे श्रद्धास्थान असलेले तुळजापूर हे शक्ती पीठ आणि शिखर शिंगणापूर हे शिवपीट यांना जोडणारा महामार्ग व्हावा या मागणीसाठी शिवसेनेचे माढा लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी कावड यात्रा काढून लक्ष वेधले. तुळजापूर येथून दुपारी दोन वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत कावड यात्रा काढली. या कावड यात्रेस अनेकांनी सहभाग नोंदवला.
तुळजापूर येथून काढण्यात आलेल्या कावड यात्रेच्या प्रस्थान प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत, दादासाहेब साठे, प्रा. सुहास पाटील, अनिल पाटील, औदुंबर महाडिक, पोपट अनपट, राजाभाऊ चवरे, विनोद पाटील, नागेश बोबडे, योगेश पाटील, विजय पवार, राहुल कुलकर्णी, परीक्षित पाटील, जयवंत पोळ, तुकाराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
तुळजापूर ते शिखर शिंगणापूर हा चार पदरी महामार्ग व्हावा अशी मागणी शिवसेनेचे संजय कोकाटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. महामार्ग निर्मितीवर आलेली स्थगिती उठवून विशेष बाब म्हणून या मार्गाचे काम करावे याकडे लक्ष वेधण्यासाठी ही कावड यात्रा काढण्यात आली.
शिंगणापूर पासून माळशिरस तालुक्यातील लवंग पर्यंत पालखी मार्गाचे काम झाले आहे. आता केवळ तुळजापूर, वैराग ,माढा, चिंचोली, भुताष्टे, पडसाळी, भेंड, वरवडे ,परितेवाडी, बेंबळे ,वाफेगाव व लवंग पर्यंत अशा एकूण १२० कि.मी. महामार्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे. कावड यात्रेचा मंगळवारी तिसरा दिवस आहे. तुळजापूर येथून निघाल्यापासून कावड यात्रेचे गावोगावी स्वागत करण्यात होत आहे.