कव्हे-कोरफळे रस्त्यावर झाडे पेटवून दिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:17 AM2021-05-28T04:17:43+5:302021-05-28T04:17:43+5:30
बार्शी : मोहोळ मार्गावर कव्हे-कोरफळे रस्त्यावर सरकारी जागेतील झाडे पेटवून दिली. पाहता-पाहता आग पसरत गेली आणि अनेक झाडांनी पेट ...
बार्शी : मोहोळ मार्गावर कव्हे-कोरफळे रस्त्यावर सरकारी जागेतील झाडे पेटवून दिली. पाहता-पाहता आग पसरत गेली आणि अनेक झाडांनी पेट घेतला. त्यामुळे काही वेळ वाहतूकही ठप्प झाली होती. मात्र, नागरिकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली.
बार्शी मोहोळ रस्त्यावरील कव्हे ते कोरफळे रस्त्याच्या कडेला असलेली काही झाडे जाणीवपूर्वक जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. एका झाडाचे खोड जळून झाड रस्त्यावर आडवे पडल्याचे निदर्शनास आले. त्या झाडास रस्त्याच्या बाजूला काढणे शक्य नव्हते. तसेच तेथील आणखीन काही झाडाचे बुंदे जळत असलेले दिसून आले. जळून रस्त्यावर पडलेल्या झाडामुळे वाहतूक काही वेळ थांबली होती.
अशा स्थितीत कन्स्ट्रक्शनकडील पोकलेनच्या मदतीने नीलेश तांबे या अभियंत्यांनी ते बुडापासून पेटलेले झाड रस्त्याच्या बाजूला केले. रस्त्यावर जळून पडलेली लाकडे आणि काटेदेखील बाजूला केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. सहजीवन परिवाराचे मार्गदर्शक दीनानाथ काटकर, संस्थेचे अध्यक्ष बालाजी डोईफोडे यांनी पाण्याचा मारा करुन काही झाडं विझवली. दरम्यानच्या पोलीस प्रशासन, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी जवळपास सात झाडं विझवली.
पोलीस पाटील अमित पाटील, पोलीस नाईक प्रदीप केसरे, बळीराम बेद्रे ग्रामपंचायत शिपाई विलास शेंडगे, किरण गडके, अग्निशामकचे भैरू राऊत, महेश माळी, चालक अजय कांबळे, सुहास कांबळे, मनीष देशपांडे, विनोद जाधव, किशोर कांबळे, अमर पाटील, सतीश नेटके, सुमित नवले यांनी लोकांच्या जीवितास धोका होणार नाही याची काळजी घेतली.
----
फोटो : २७ बार्शी
कव्हे-कोरफळे रस्त्यावर समाजकंटकाकडून शासकीय जागेतील झाडे पेटवून दिली.