केसीआर यांचे मित्र सोलापुरात दाखल; कारमपुरींना फोन, सादूल सोबत बैठक
By बाळकृष्ण दोड्डी | Published: March 20, 2023 05:16 PM2023-03-20T17:16:59+5:302023-03-20T17:17:51+5:30
नांदेड नंतर आता सोलापुरात सभा घेण्याची तयारी केसीआर करत असल्याची माहिती आहे.
सोलापूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे शालेय मित्र मलेशम बुरा हे सोलापुरात दाखल झाले असून माजी महापौर जनार्दन कारमपुरी यांच्याशी त्यांनी फोनवर संवाद साधला. त्यांची भेट घेण्याची विनंती त्यांनी केली आहे. तसेच माजी खासदार धर्मण्णा सादूल यांच्यासोबत बैठक झाल्याचीही माहिती आहे. याबाबत सादूल यांना विचारले असता ते म्हणाले, केसीआर यांचे जवळचे मित्र माझ्या संपर्कात आहेत. फोन करत आहेत. माझ्यासोबत बैठक घेण्याची विनंती करत आहेत. परंतु अद्याप त्यांना माझा निर्णय कळविलेला नाही.
नांदेड नंतर आता सोलापुरात सभा घेण्याची तयारी केसीआर करत असल्याची माहिती आहे. सोलापुरातील विविध मान्यवरांशी संवाद साधून त्यांना केसीआरची भूमिका समजावून सांगण्याचे काम मलेशम बुरा करत आहेत. बुरा हे मूळचे सिद्धीपेठ येथील व्यापारी आहेत. नांदेडमध्ये सभा घेण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली असून केसीआर यांनी आता सोलापूरची जबाबदारी बुरा यांच्याकडे दिली आहे.