एनटीपीसी आणि अल्ट्राटेक कंपन्यांच्या करावर डोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:55 AM2021-01-13T04:55:07+5:302021-01-13T04:55:07+5:30
दक्षिण सोलापूर : एनटीपीसी आणि अल्ट्राटेक या मोठ्या कंपन्यांकडून होणाऱ्या करवसुलीच्या मुद्द्यावर विरोधकांनी बोट ठेवले आहे. सत्ताधाऱ्यांनी आकारलेला कर ...
दक्षिण सोलापूर : एनटीपीसी आणि अल्ट्राटेक या मोठ्या कंपन्यांकडून होणाऱ्या करवसुलीच्या मुद्द्यावर विरोधकांनी बोट ठेवले आहे. सत्ताधाऱ्यांनी आकारलेला कर योग्य असल्याचा निर्वाळा होटगी स्टेशन ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचारातून दिला आहे.
तब्बल १४ हजार कोटीं खर्चाचा एनटीपीसीचा ऊर्जा निर्मिती प्रकल्प आणि ३०० कोटींचा बिर्ला उद्योग समूहाचा अल्ट्राटेक सिमेंट कारखाना होटगीस्टेशनच्या हद्दीत आहे. ग्रामपंचायतीसाठी हे दोन्ही प्रकल्प दुभती गाय समजले जातात. ग्रामपंचायतीला त्यातून लाखोंचा कर मिळतो. त्यातून विकासकामे मार्गी लागू शकतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एनटीपीसी ग्रामपंचायतीला करांऐवजी विकासनिधी देते. तर अल्ट्राटेक सिमेंटकडून ग्रामपंचायतीला वार्षिक २७ लाख ५५ हजार कर मिळतो. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत तीन पॅनल रिंगणात आहेत. सत्ताधारी सुभाष पाटोळे, जयवंत शिंदे, आनंतसिंह रजपूत, हमीद बागवान, सुभाष लोखंडे यांचे समर्थ ग्रामविकास पॅनल (११ उमेदवार), भाजपचे जगन्नाथ गायकवाड, सेनेचे माजी तालुकाप्रमुख बापू कोकरे, शाहरूख बलोलखान यांचे जगदंब ग्रामविकास पॅनल(८ उमेदवार) आणि निसार कांबळे, मिलिंद मुळे यांचे जनसेवा ग्रामविकास पॅनल (७ उमेदवार) अशी तिरंगी लढत होत आहे. तिनही पॅनेलने आपली शक्ती पणाला लावली आहे.
उद्योगातून मिळणारा कर, त्याची आकारणी या मुद्द्याला केंद्रस्थानी ठेवून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे. वास्तविक अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून वार्षिक ८० लाख रुपये ग्रामपंचायतीला कर मिळायला हवा होता. परंतु तो कमी आकारल्याने ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान होत असल्याचा विरोधी पॅनलचा प्रमुख मुद्दा आहे. सत्ताधारी पाटोळे गटाने गेल्या अनेक वर्षांपासून ३ लाख ७५ हजार रुपयांवरून २७ लाखांपर्यंत कर वसूल केल्याचा दावा केला आहे. कर आकारणीत गडबड नसून विरोधकांच्या त्यामागील भावना स्वच्छ नाहीत, असा टोला सुभाष पाटोळे यांनी लगावला आहे.
---------
होटगीस्टेशन ग्रामपंचायत
एकूण जागा - ११
पॅनलची संख्या - ३
उमेदवार - २९
मतदार संख्या - ३०००
मोठे प्रकल्प - एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट