शिवजयंतीदिनी सोलापुरात जन्मणाºया बाळांना देणार पाळणे; शिवबा-जिजाऊंचे नाव देण्याची करणार विनंती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 02:03 PM2019-02-11T14:03:43+5:302019-02-11T14:05:21+5:30
रेवणसिद्ध जवळेकर सोलापूर : १८ फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजून १ मिनिटापर्यंत ते १९ फेब्रुवारीच्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत ...
रेवणसिद्ध जवळेकर
सोलापूर : १८ फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजून १ मिनिटापर्यंत ते १९ फेब्रुवारीच्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत म्हणजेच शिवजयंतीदिनी जन्मणाºया नवजात शिशूंच्या माता-पित्यांचा त्याच दिवशी सन्मान अन् त्यानंतर शिशूंसाठी पाळणे देऊन राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना अनोखे अभिवादन करण्यासाठी महापालिकेतील अधिकारी, कर्मचाºयांनी स्थापन केलेला जगदंब ग्रुप सरसावला आहे. ‘बदलतं सोलापूर-बदलता उत्सव’ सोहळ्यात सहभागी ३०० कर्मचारी (अधिकाºयांसह) आपल्या स्वखर्चातून हा उपक्रम यशस्वी करणार असून, मुलगा जन्मला तर शिवबा अन् मुलगी जन्मली तर जिजाऊंचे नाव देण्याची विनंतीही ग्रुपचे सदस्य करणार आहेत.
‘लोकमत’ च्या ‘शिवजन्मोत्सवाची तयारी... थाट सोलापुरी’चा प्रभाव जगदंब ग्रुपच्या सदस्यांवर पडला. रविवारी सकाळी ग्रुपचे काही सदस्य एकत्र येऊन अभिवादनाचा हा अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. दाराशा हॉस्पिटल, भावनाऋषी, रामवाडी, डफरीन (अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृह), मदर तेरेसा, चाकोते प्रसूतिगृह (जोडभावी पेठ), बॉईज मॅटर्निटी (कन्ना चौक) या महापालिकेच्या प्रसूतिगृहांमध्येच जन्मणाºया नवजात शिशूंचं कौतुक करण्यासाठी त्यांच्या माता-पित्यांना गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात येणार आहे. शिवजयंतीदिनी जन्मणाºया बाळांना बाटलीसह दूधही देण्यात येणार आहे.
जगदंब ग्रुपच्या शिवजयंतीचे यंदा केवळ दुसरेच वर्ष आहे. गणेश डेंगळे, मेघराज साळुंके, भारत गायकवाड, के. बी. माने, दीपक भोसले, राजू पवार, नागेश बंदपट्टे, अनंत थोरात, प्रभूलिंग पुजारी, आदिनाथ जाधव, राजेश पवार आदी अधिकारी, कर्मचारी यंदाच्या शिवजयंती सोहळ्यातील हा आगळा-वेगळा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शिवजयंतीसाठी इथे ना पदाधिकारी, ना कार्यकारिणी... सगळेच पदाधिकाºयांच्या भूमिकेत वावरत असतात. अंगात केसरी (भगवा) रंगाचा शर्ट आणि पांढºया रंगाची पॅन्ट या पोषाखात ग्रुपचे कार्यकर्ते मध्यवर्तीच्या मिरवणुकीत सहभागी होताना छत्रपतींच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत.
उपक्रमातून ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’चा संदेश
४मुलाने जन्म घेतला तर आनंद अन् मुलीने जन्म घेतला तर आनंदावर विरजण... असा काहीसा प्रसंग ज्या-त्या संबंधित कुटुंबावर येतो. ‘मुलगा काय-मुलगी काय- दोघे सारखेच’ हा संदेश जगदंब ग्रुपच्या माध्यमातून शिवजयंतीदिनी देण्याची संधी मिळणार असल्याचे गणेश डेंगळे, नागेश बंदपट्टे, आदिनाथ जाधव, राजेश पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
‘लोकमत’च्या ‘शिवजन्मोत्सवाची तयारी... थाट सोलापुरी’या संकल्पनेस साजेसा उपक्रम हाती घेण्याचा योग आला. मुलगा जन्मला तर शिवबा अन् मुलगी जन्मली तर जिजाऊंचे नाव देण्याची विनंती आम्ही करणार आहोत.
- गणेश डेंगळे
शिवजयंतीचा उत्सव इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने साजरा होतोय. याचा अधिक आनंद आहे. शिवबा अथवा जिजाऊंचे नाव देण्याच्या आवाहनातून मुलगा-मुलगीतील भेद नक्कीच कमी होईल. एक चांगला संदेश जाईल.
- नागेश बंदपट्टे
ज्या छत्रपतींनी सर्वच जाती-धर्मांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्या छत्रपतींचे विचार घराघरापर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम आहे. जगदंब ग्रुपच्या या अनोख्या उपक्रमातून छत्रपती शिवाजी राजेंना अभिवादन करु.
- आदिनाथ जाधव
राजा शिवछत्रपतींच्या राज्यात स्त्री-पुरुष समानता होती. कुठलाच भेदभाव नव्हता. तोच विचार घेऊन जगदंब ग्रुपने हाती घेतलेल्या या उपक्रमांतून शिवछत्रपतींच्या विचारांचा जागर, जागरण होणार आहे, याचा आनंद आहे.
- राजेश पवार