सोलापुरात केजरीवाल पॅटर्न; तोडलेली वीज जोडत ‘आप’ने राबविली मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 12:23 PM2021-02-24T12:23:50+5:302021-02-24T12:23:56+5:30
महावितरणला दिले निवेदन: नवीन विडी घरकुलात दहा कनेक्शन जोडले
सोलापूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी दिल्लीत वीज पुरवठा कंपन्यांविरोधात जोरदार आंदोलन केले. वीज बिल थकीत असलेल्या नागरिकांच्या घरी वीज कंपन्यांकडून वीज कनेक्शन तोडले जात होते. हा केजरीवाल पॅटर्न सोलापुरात आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते वीज महावितरणने तोडलेले वीज कनेक्शन जोडत केजरीवाल पॅटर्न राबवत आहेत. गोदुताई विडी घरकुल येथील दहा नागरिकांच्या घरी आपच्या कार्यकर्त्यांनी वीज कनेक्शन जोडून दिले. त्यामुळे तेथील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वीज महावितरणचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे यांना आम आदमी पार्टीकडून निवेदन देण्यात आले. लॉकडाउन काळात सर्वांची अर्थव्यवस्था बिघडली. अनेकांचे कुटुंब अद्याप पूर्वपदावर आलेले नाही. त्यामुळे विज बिल थकले म्हणून सर्वसामान्य नागरिकांचे वीज कनेक्शन तोडू नका, असे आवाहन आपच्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
वीज कनेक्शन तोडण्यापूर्वी संबंधित नागरिकांना १५ दिवस अगोदर पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. तशी पूर्वसूचना न देता वीज महावितरणचे पदाधिकारी थेट वीज कनेक्शन तोडत आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या वेळी आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष अस्लम शेख, रॉबर्ट गौडेर, नासिर मंगलगिरी, निहाल किरनळ्ळी, असिफ शेख आदी उपस्थित होते.
वीज बिल माफ करा
अधिक माहिती देताना आपचे शहराध्यक्ष अस्लम शेख यांनी सांगितले, लॉकडाउन काळात २०० युनिट प्रति महिना वीज वापर असलेल्या ग्राहकांचे वीजबील माफ करा. १ एप्रिल २०२० पासून केलेली दरवाढ मागे घेण्यात यावी, या मागणीचे निवेदन सरकार तसेच विद्युत महावितरण कंपनीच्या प्रमुखांना दिले. विज बिल माफ व्हावे, याकरिता आम्ही सरकारकडे वारंवार पाठपुरावा करत आहोत. सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. उलट वीजबिल न भरलेल्या नागरिकांच्या घरी वीजकनेक्शन तोडत आहेत. दिल्लीच्या धर्तीवर आम्ही तोडलेले कनेक्शन पुन्हा-पुन्हा जोडू . ही मोहीम ''आप''ने सुरू केली आहे. ज्या नागरिकांच्या घरी वीज तोडतील, त्यांनी आमच्याशी संपर्क करावा.