केनियातील भारतीयांनी घेतला हास्यकल्लोळचा मनमुराद आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 02:44 PM2019-09-09T14:44:53+5:302019-09-09T14:47:10+5:30
हास्यकल्लोळ हा अस्सल सोलापुरी कार्यक्रम आता भारतातच नव्हे तर जगभर प्रसिद्ध झाला आहे.
सोलापूर : हास्यकल्लोळ हा अस्सल सोलापुरी कार्यक्रम आता भारतातच नव्हे तर जगभर प्रसिद्ध झाला आहे. अमेरिका, इंग्लंड, इंडोनेशिया, फ्रान्स, जर्मनी, थायलंड आदी देशांत तर केनिया येथे प्रा. दीपक देशपांडे यांचा कार्यक्रम झाला. तेथील सर्व भाषिक भारतीयांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
नैरोबी हे शहर केनिया या देशातील आहे. हा देश पूर्व आफ्रिकेमध्ये येतो. नैरोबी येथील महाराष्ट्र मंडळातर्फे साजरा करण्यात येत असलेल्या गणेशोत्सवात प्रा. दीपक देशपांडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज पाटील हे या मंडळाचे सध्याचे अध्यक्ष आहेत.
त्यांच्या पुढाकाराने, अमित जहागीरदार यांच्या सहकार्याने दोन सप्टेंबरला हास्यकल्लोळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कै. आप्पासाहेब पंत यांनी नैरोबी महाराष्ट्र मंडळाची स्थापना १९४५ मध्ये केली. नैरोबी येथील महाराष्ट्र मंडळ हे परदेशातील सर्वात जुने महाराष्ट्र मंडळ आहे. १९५२ मध्ये या मंडळाला स्वतंत्र जागा मिळाली. त्यानंतर तीन एकर जागेत सभागृह आणि गृह संकुलाच्या सहा इमारती उभारण्यात आल्या. येथे गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला जातो.
नैरोबीत राहणारे सर्व भाषिक भारतीयांना महाप्रसादाचे जेवण दिले जाते. या कार्यक्रमाला नैरोबी महाराष्ट्र मंडळाचे तीनशे सदस्य उपस्थित होते.