सोलापूर शहरातील रस्त्यांवर पडले खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:41 PM2018-07-17T12:41:39+5:302018-07-17T12:45:03+5:30
रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारक, शाळकरी मुले व वृद्धांना यातून मार्ग काढणे जिकिरीचे होऊन बसले आहे
सोलापूर : गेले चार दिवस सोलापुरात सुरू असलेल्या संततधार पावसाने शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारक, शाळकरी मुले व वृद्धांना यातून मार्ग काढणे जिकिरीचे होऊन बसले आहे.
शहरात गेल्या चार दिवसांपासून संततधार सुरू आहे. पावसाची रिपरिप सुरू झाल्यावर नव्याने करण्यात येणाºया रस्त्यांची कामे थांबविण्यात आली आहेत. पूर्वीच्या जुन्या रस्त्यावर पडलेले खड्डे पावसाने मोठी झाली आहेत. खड्ड्यात पाणी साचून राहत असल्याने अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यांची चाळण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जुळे सोलापूर, होटगी रोड, विजापूर रोड परिसरात ड्रेनेज जोडणीमुळे रस्त्यावर पडलेले खड्डे आणखी मोठे झाले आहेत. ड्रेनेज जोडणीसाठी खोदलेल्या खड्ड्यांबाबत महापालिकेने पैसे घेतले पण खड्डे बुजविलेच नाहीत. याचा मोठा फटका वाहनधारकांना बसत आहे. नगरोत्थानमधून झालेल्या चांगल्या रस्त्यांची वाट लागली आहे.
नई जिंदगी, विडी घरकूल, शेळगी, बाळे व हद्दवाढ भागातील नव्याने झालेल्या वसाहतींना जोडणारे रस्ते चिखलमय झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. सोसायटींच्या रस्त्यांसाठी मुरुम देण्याचे बंद झाले आहे. यामुळे पायी व चालत जाणाºया नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. उर्वरित हद्दवाढ भागासाठी नव्याने ड्रेनेज योजना मंजूर झाली आहे. त्यामुळे हे काम होईपर्यंत रस्त्यांची कामे बंद करण्यात आली आहेत. पण प्रत्यक्षात अद्याप कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. सिव्हिल हॉस्पिटल ते मौलाली चौक, बेडरपूल, पोटफाडी चौक ते कोंतम चौक, आयएमएस स्कूल ते सैफुल, विजापूर रोड, होटगी रोड, भैय्या चौक या मार्गावर खड्डे पडले आहेत.
रस्त्याच्या खड्ड्यात गप्पी मासे...
- डेंग्यू, मलेरियाच्या डासमुक्तीसाठी पावसाने साठलेल्या पाण्याच्या डबक्यात गप्पी मासे सोडण्याची मलेरिया विभागाची मोहीम आहे. पण रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्याकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी खड्ड्यातील पाण्यात गप्पी मासे सोडले. खड्डे बुजविण्यासाठी निधी मिळत नाही. नागरिक समस्यांमुळे बेहाल झाल्याचा त्यांनी आरोप केला. या आंदोलनात शौकत पठाण, मुमताज गौर, उषा कसबे, शेहनाज शेख, मेहराज मुल्ला, परवीन शेख व शाळकरी मुले सहभागी झाले. रस्त्यावर चिखल साठला असून, खड्डे चुकविणाºया वाहनांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. भरधाव वाहने अशा खड्ड्यात आदळून शाळकरी मुलांच्या अंगावर घाण उडत आहे.
पावसामुळे नवीन रस्त्यांची कामे बंद ठेवली आहेत. खड्डे बुजवण्यासाठी मुरूमाचा वापर केला जाईल. पाऊस थांबल्यानंतर प्रिमिक्सद्वारे खड्डे बुजवले जातील.
-संदीप कारंजे, प्रभारी नगर अभियंता.