खाकी वर्दीची ऐशीतैशी !
By admin | Published: July 16, 2014 12:45 AM2014-07-16T00:45:08+5:302014-07-16T00:45:08+5:30
मनोरुग्णाचा प्रकार : काही काळ वाहतुकीचे केले नियोजन!
सोलापूर: पोलीस खात्यात खाकी वर्दीला मान-सन्मान आहे. खात्यातील अधिकारी, कर्मचारीच खाकी वर्दी परिधान करू शकतात. इतर कोणी खाकी पोशाख परिधान करू शकत नाही. मंगळवारी सकाळी सात रस्ता चौकातील शासकीय विश्रामगृहासमोरील एका ट्रॅफिक बूथमध्ये चक्क एका मनोरुग्णाने खाकी वर्दी घालून काही काळ वाहतुकीचे नियोजनही केले.
शासकीय विश्रामगृहासमोरील एका कंपनीने विशिष्ट आणि लहानशा आकारातील ट्रॅफिक बूथ दिले आहे. वास्तविक या बूथचा वापर होत नाही. याच बूथच्या कट्ट्यावर खाकी वर्दी परिधान केलेला वेडसर इसम येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांचे कधी निरीक्षण करायचा, तर मधूनच तो बूथमध्ये थांबून वाहतूक पोलिसांप्रमाणे हातवारे करायचा. मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना याचे नवलही वाटत होते अन् आश्चर्यही. त्यातच एका अधिकाऱ्याची पोलीस गाडीही तेथून पास झाली. त्यांच्याही लक्षात हा प्रकार आला नाही, हे विशेष म्हणावे लागेल. त्याला बोलते केले असता तो मूळचा अहमदाबादचा असल्याचे समजले. ५० टक्के वेडसर असलेला हा अर्जुन सोलापुरातील भावाकडे आला आहे. पोलीस पोशाख कुठून मिळविलास, यावर त्याने सांगणे नाकारले. रस्त्यावर हातवारे करीत असताना त्याचे अनेक पोज छायाचित्रकाराने टिपले. पोज देताना मात्र तो पोशाखावरील महाराष्ट्र पोलीस आणि खात्याचे बोधचिन्ह न घेण्याचा सल्लाही दिला.
---------------------
दुरुपयोग नको !
आजपर्यंतचे अनेक गुन्हे पाहता पोलिसांचा पोशाख, रेनकोट, मोटरसायकली (ज्यावर पोलीस असा उल्लेख आहे) आदींचा वापर करीत चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. पोलिसांचा एखादा पोशाख खराब झाला तर त्यावरील बोधचिन्ह न काढता ते तसेच टाकून दिले तर त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. याविषयी खात्याची निश्चित नियमावली असू शकते.
------------------
अधिकारी, कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कुणीही खाकी वर्दी घातली तर तो गुन्हा होऊ शकतो. वर्दी खराब झाली तर ती कोणालाही देण्यापूर्वी अथवा निकालात काढण्यापूर्वी त्यावरील पोलीस खात्याचा बॅच काढून घेणे बंधनकारक आहे. त्याचा अवमान होता कामा नये.
- खुशालचंद बाहेती
सहायक पोलीस आयुक्त