नातवाला वाचविण्यासाठी पोलिसांचा मार सहन करणाºया आजोबांना ‘खाकी’नेच मिळवून दिले रक्त...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 11:36 AM2020-03-28T11:36:24+5:302020-03-28T11:42:19+5:30
माणुसकीचे अनोखे दर्शन; छडीमार टाळण्यासाठी त्यांनी घेतला ट्रकचा आधार
नारायण चव्हाण
सोलापूर : रक्तासाठी पोलिसांचा मार खाऊन परतलेल्या आजोबांना दुसºया दिवशी त्याच पोलिसांनी स्वत: पुढाकार घेऊन रक्तपेढीपर्यंत नेले आणि त्यांना रक्त मिळवून दिल्याने नातवासाठी धावपळ करणाºया आजोबांचा जीव भांड्यात पडला अन् बाळालाही जीवदान मिळाले.
सोमवारी दशरथ जाधव (चुंगी) यांच्या पत्नीने चपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळाला जन्म दिला़ जन्मत:च बाळ कमी वजनाचे भरले, त्यामुळे तेथील डॉक्टरांनी उपचारासाठी सोलापूरच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. मंगळवारी या बाळाला कुंभारीच्या अश्विनी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले़ तपासणीनंतर बालरोग तज्ज्ञांनी बाळाच्या शरीरात रक्ताची कमतरता असून, त्याला तातडीने रक्त पुरवठा करावा लागेल, असा सल्ला दिला.
त्याच दिवशी संचारबंदी लागू करण्यात आली होती. बाळाचे आजोबा रमाकांत जाधव रात्री रक्तपेढीतून रक्त (प्लाज्मा) आणण्यासाठी दुचाकीवरून बाहेर पडले़ सात रस्ता येथे पोलिसांनी त्यांना अडवले आणि फटके दिले. हिरमुसलेल्या आजोबांना माघारी दवाखान्यात परतण्याशिवाय पर्याय नव्हता. तिकडे बाळाची प्रकृती अत्यंत नाजूक बनत होती.
सोलापुरात जाऊन रक्त आणण्याची अनेकांना विनंती केली, परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही़ अखेर रात्री ट्रकमध्ये बसून त्यांनी पुन्हा छत्रपती रंगभवन गाठले.
बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बसथांब्यावर उभ्या असलेल्या रमाकांत जाधव यांना पोलीस हुसकावत होते़ त्यावेळी त्यांनी आपली अडचण सांगितली़ तेव्हा कर्तव्यावर असलेल्या दोन पोलिसांनी आपल्यासोबत दुचाकीवर घेतले. दमाणी रक्तपेढीपर्यंत नेले, रक्ताची पिशवी घेऊन त्यांना कुंभारीच्या अश्विनी रुग्णालयात आणून सोडले. पोलिसांनी दाखवलेल्या या माणुसकीचे अनोखे दर्शन आजोबांना घडले. बाळाला जीवदान मिळाले. पोलिसांनी कायद्याचा बडगा दाखवल्याने निराश झालेल्या जाधव कुटुंबीयांना त्याच पोलिसांनी दाखवलेली माणुसकी सुखावून गेली़ याबाबतची माहिती मिळताच रूग्णालयातील नातेवाईकांनी पोलिसांचेही आभार मानले.
संचारबंदी काळातही माणुसकीचे दर्शन..
- शहरात संचारबंदी असल्याने शहर पोलिसांकडून विनाकारण रस्त्यांवरून फिरणाºया वाहनधारकांना पोलिसांकडून काठीचा प्रसाद मिळत असल्याची गोष्ट घडत असताना काही पोलीस अधिकाºयांकडून गोरगरिबांना अन्नदान करून माणुसकीचे दर्शन घडत असल्याचेही पकहायला मिळाले.