‘खळं जेवण’ अथवा ‘डावरा’ ; नामशेष झालेला कृषी उत्सव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 02:56 PM2019-04-04T14:56:41+5:302019-04-04T14:59:18+5:30

ऋतू आणि उत्सव यांची आपल्या कृषीप्रधान देशात सुरुवातीपासून सांगड घातलेली आहे. प्रत्येक सण, उत्सव, प्रथा, परंपरा, विधी याचा संबंध शेतीशी निगडित आहे.

'Khaln Meal' or 'Dawa'; Extinct farm festival! | ‘खळं जेवण’ अथवा ‘डावरा’ ; नामशेष झालेला कृषी उत्सव !

‘खळं जेवण’ अथवा ‘डावरा’ ; नामशेष झालेला कृषी उत्सव !

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्यापासून ते शिंमग्यापर्यंतच्या सर्व सण-उत्सवाला ऋतू व शेतीकाम यांची जोडसुगी संपल्यावर मळलेल्या नवीन धान्याची पूजा करून त्याचे जेवण तयार करून खळ्याभोवती बसून रात्री जेवणाचा जो कार्यक्रम होतो त्यास ‘खळं जेवण’ म्हटलं जायचं.

ऋतू आणि उत्सव यांची आपल्या कृषीप्रधान देशात सुरुवातीपासून सांगड घातलेली आहे. प्रत्येक सण, उत्सव, प्रथा, परंपरा, विधी याचा संबंध शेतीशी निगडित आहे. एवढेच नव्हे तर जत्रा, यात्रा, धार्मिक विधी, लग्नकार्य यांचाही संबंध ऋतू आणि शेती यांच्याशी घट्ट जोडलेला आहे. महाराष्ट्रही याला अपवाद नाही.

महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्यापासून ते शिंमग्यापर्यंतच्या सर्व सण-उत्सवाला ऋतू व शेतीकाम यांची जोड आहे. या उत्सव, प्रथा, परंपरा, विधी यांचे स्वरूप फक्त धार्मिक नव्हते तर त्यातून सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी व्हावे असा उदात्त हेतू असायचा. काळाच्या ओघात व गतीच्या चक्रात कितीतरी प्रथा, परंपरा, उत्सव लोप पावल्या तर काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ‘खळं जेवण’ अथवा ‘डावरा’ हा असाच एक जवळपास नामशेष झालेला कृषी उत्सव!

सुगी संपल्यावर मळलेल्या नवीन धान्याची पूजा करून त्याचे जेवण तयार करून खळ्याभोवती बसून रात्री जेवणाचा जो कार्यक्रम होतो त्यास ‘खळं जेवण’ म्हटलं जायचं. महाराष्ट्रात हा एक उत्सव म्हणून साजरा व्हायचा. काळाच्या ओघात ही प्रथा बंद पडली आणि निसर्गाचे ऋण फेडण्याची परंपरा लुप्त झाली. ज्या बलुतेदारांनी शेतकरी राजाला त्याच्या शेतीसाठी व दैनंदिन गोष्टींसाठी मदत केली त्यांचेही ऋण व्यक्त करण्यासाठी ‘खळं जेवण’ एक महत्त्वाचा उत्सव ठरायचा. 

साधारणपणे मार्च महिन्यात गहू, ज्वारीची मळणी होते.पूर्वी मळणीसाठी बैलांचा वापर होई. सर्व शेतकरी सावड पध्दतीने एकमेकांच्या पिकांची काढणी आणि मळणी करत. शेतामध्ये जमिनीवर खळं तयार केले जात असे. खळं करताना अगोदर त्यामध्ये पाणी सोडले जाई. मग मोटेच्या कण्याने फिरवून दुमूस केला जाई. त्यामध्ये भुसा मिसळला जाई जेणेकरून सर्व मिश्रण एकजीव होई. त्यानंतर शेणाने सारवून खळे एकदम लख्ख केले जाई. गोल २० फूट त्रिज्या असणाºया  खळ्यामध्ये लाकडी खांब लावला जाई. त्या खांबाला बैल बांधून खळ्यामध्ये पसरलेल्या कणसांवरून बैलं फिरवत. त्यामुळे कणीसातील दाणे मोकळे होत व नंतर त्याची उफणनी करुन शुभ्र मोत्यांची रास खळ्यामध्ये दिसू लागे.

आता मळणी यंत्रे आली, आधुनिकीकरण झाले आणि ही प्रथा काळाच्या पडद्याआड गेली. हाच धागा पकडून आम्ही आमच्या सहकुटुंबांनी मिळून हा उत्सव साजरा करण्याचे ठरविले. सुमारे पंचवीस-तीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून नामशेष झालेला, ‘खळं जेवण’ हा उत्सव पुन्हा एकदा पाकणी या गावच्या शिवारात अनुभवायला मिळाला.  या लुप्त झालेल्या उत्सवासाठी विविध क्षेत्रातील मंडळींनी आवर्जून हजेरी लावून जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

या खळं जेवणासाठी मोठे खळे तयार केले, ज्वारीच्या पेंढ्यांची बुचाडे उभी केली, बैलगाडी तयारच होती. खळ्याच्या मधोमध असणाºया खांबाच्या भोवती धान्याची पोती लावलेली, खळ्याच्या  बाजूला पेटलेले पलिते, पेटलेली दिवटी, बाल भजनी मंडळाचा हरिपाठ आणि भजनाचा उद्घोष यामुळे वातावरण उत्साहवर्धक झाले. सूप, जाते, मोगा, या पारंपरिक वस्तूचे पूजन आणि चंद्रप्रकाश यामुळे सर्वजण तीस वर्षे मागे गेले. मका/ज्वारी/बाजरी भाकरी, बाजार आमटी, मसाले वांगे, भात, खीर, ताक असा गावरान नैवेद्य! धान्याची पारंपरिक पद्धतीने झालेली पूजा आणि खळ्याच्या गोलाकार बसलेल्या पंगती यामुळे हा उत्सव एकदम नवीन वाटला. 

शेतातच  चुलवन करून भाज्या शिजवण्याचे काम पुरुषांनी केले होते तर भाकरी चपात्या स्त्रियांनी बनविल्या. नवीन धान्यापासून तयार केलेल्या जेवणाचा नैवेद्य अर्पण केला गेला. घरधनी आणि कारभारीन यांनी धान्याच्या रासेची यथासांग पूजा करून हातात दिवटी घेऊन दोघांनी खळ्याभोवती फेºया मारल्या. सर्व महिलांनी खळ्याला हळदी कुंकू वाहिले व पूजा केली. यानंतर सर्वांनी चंद्रप्रकाशात खळ्याभोवती बसून जेवणाचा आस्वाद घेतला. आग्रहाने जेवण वाढले !

नवीन धान्याची चव चाखल्यानंतर भजन कार्यक्रम झाला. काळ्या आईचं पांग फेडण्यासाठी केलेला हा उत्सव आता स्मृतीतूनही जातो की काय असे वाटायला लागलं असतानाच हा उत्सव पुन्हा साजरा झाला. शेतकरी बंधूंनी असे महोत्सव पुन्हा सुरू करावेत असा सूर उपस्थितांनी लावला. 
- प्रा. डॉ. सुवर्णा चवरे
(लेखिका शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.)

Web Title: 'Khaln Meal' or 'Dawa'; Extinct farm festival!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.