सीताफळात अर्ली छाटणी प्रयोगाचा खामगावच्या शेतकऱ्याला फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:26 AM2021-09-15T04:26:44+5:302021-09-15T04:26:44+5:30

बार्शी : काही शेतकरी शेती करत असताना ती पारंपरिक पद्धतीने न करता सातत्याने नवीन प्रयोग करून उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्नशील ...

Khamgaon farmers benefit from early pruning experiment in custard apple | सीताफळात अर्ली छाटणी प्रयोगाचा खामगावच्या शेतकऱ्याला फायदा

सीताफळात अर्ली छाटणी प्रयोगाचा खामगावच्या शेतकऱ्याला फायदा

Next

बार्शी : काही शेतकरी शेती करत असताना ती पारंपरिक पद्धतीने न करता सातत्याने नवीन प्रयोग करून उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. असाच एक भन्नाट प्रयोग बार्शी तालुक्यातील खामगाव येथील सीताफळ उत्पादक शेतकरी राजेंद्र ठोंबरे यांनी यशस्वी करून दाखविला आहे.

त्यानी जूनमध्ये होणारी फळ छाटणी मार्चमध्येच केली आणि अन्य सीताफळाच्या तुलनेत तीन-साडेतीन महिने आधीच फळे बाजारात आणल्याने, त्यांच्या सीताफळाला दिल्ली बाजारपेठेत १८० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.

ठोंबरे हे प्रगतशील सीताफळ उत्पादक असून, २५ एकरांवर संकरित वाणाचे सीताफळ आहे.

साधारण या सर्व बागेचा बहर धरण्यासाठी जूनमध्येच छाटणी करून, पुढील व्यवस्थापन करतात, पण यंदा त्यांनी नवा प्रयोग म्हणून सीताफळाची तीन महिने आधीच (अर्ली) छाटणी करून बहार धरला. सध्या या बागेतील फळकाढणी सुरू झाली आहे. दुसरीकडे बाजारात देशी आणि गावरान सीताफळाची आवक सुरू आहे. संकरित व सुधारित वाणाची सीताफळे बाजारात नाहीत. याचा फायदा ठोंबरे यांच्या वाणाला झाला. आतापर्यंत त्यांनी तीन तोड्यांतून तीन टन सीताफळे दिल्ली बाजारात पाठविली आहेत. साहजिकच, मागणी वाढल्याने त्यांना सध्या १८० रुपये प्रतिकिलो एवढा दर मिळतो आहे.

---

अर्ली छाटणीचा फायदा

• सीताफळाला पाणी कमी लागते. मार्चमध्ये छाटणी करूनही उन्हाळ्यात पाण्याचा ताण

नाही.

• दरवर्षी जूनमध्ये बहर धरल्यानंतर पावसाळी वातावरणामुळे किमान दहा फवारण्या घ्याव्या लागतात, पण यंदा लवकर छाटणी केल्याने मार्च- एप्रिलमध्ये वातावरण पूर्णतः कोरडे राहिले.

• केवळ पाच फवारण्यांमध्ये काम झाले.

• पावसाळ्यात तणाची समस्या असते. मशागतीचा खर्च वाढतो, पण उन्हाळ्यात तण कमी असल्याने मजुरांचा खर्चही वाचला.

----

किसान रेल्वे ठरली फायद्याची

दिल्ली मार्केटला सीताफळ पाठविली जातात. किसान रेल्वेमुळे ही सोय झाली आहे. सांगोला, दौंड, कुर्डूवाडी या स्थानकावरून हा माल ते पाठवितात. अगदी प्रतिकिलो २ ते ३ रुपये प्रवास भाड्याने माल थेट दिल्लीत पोहोचतो.

---

यंदा अर्लीच्या प्रयोगामुळे दर मिळालाच, पण अतिरिक्त खर्चही वाचला. आता उशिराच्या छाटणीचा प्रयोग केला आहे. बाजारपेठेचा अभ्यास करून नियोजन केल्यास निश्चितच चांगला लाभ मिळू शकतो.

- राजेंद्र ठोंबरे, सीताफळ उत्पादक, खामगाव.

--

फोटो : १४ बार्शी सीताफळ

Web Title: Khamgaon farmers benefit from early pruning experiment in custard apple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.