खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र अजिंक्य
By admin | Published: December 31, 2014 11:25 PM2014-12-31T23:25:10+5:302015-01-01T00:13:46+5:30
मुलींच्या महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक या सामन्यात कर्नाटकला दोन्ही डावांत मिळून दहा, तर महाराष्ट्राला १५ गुण मिळाले
इचलकरंजी : राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेत मुले व मुली या दोन्ही गटांमध्ये महाराष्ट्राच्या संघांनी अजिंक्यपद मिळविले. मुलांच्या संघाने केरळवर एक डाव व एक गुणाने असा दणदणीत, तर मुलींच्या संघाने कर्नाटकवर पाच गुणांनी विजय मिळविला.
येथील नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली होती. अंतिम सामन्यामध्ये महाराष्ट्राच्या संघाने एकाच डावात केरळच्या संघातील १५ गडी टिपले, तर केरळच्या संघाने दोन्ही डावांत मिळून फक्त दहा गडी बाद केल्याने महाराष्ट्र संघाचा सहज विजय झाला. मुलींच्या महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक या सामन्यात कर्नाटकला दोन्ही डावांत मिळून दहा, तर महाराष्ट्राला १५ गुण मिळाले.विजेत्या संघांना खासदार धनंजय महाडिक, आमदार उल्हास पाटील व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते सुवर्णचषक देण्यात आला. त्याचप्रमाणे मुलांच्या केरळ व मुलींच्या कर्नाटक संघाला उपविजेतेपदाचा चषक देण्यात आला.
इचलकरंजी येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेमध्ये अजिंक्यपदाचा स्मृतिचषक महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाला देताना खासदार धनंजय महाडिक. यावेळी प्रकाश आवाडे, आमदार उल्हास पाटील, अशोक आरगे, मदन कारंडे.
राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेच्या अजिंक्यपद पटकावलेला मुलींचा संघ