अपघातात तीन ठार सात जखमी;
By admin | Published: May 20, 2014 01:12 AM2014-05-20T01:12:48+5:302014-05-20T01:12:48+5:30
लांबोटीजवळ उभ्या कंटेनरला रुग्णवाहिकेची धडक
मोहोळ : आजारी रुग्णाला पुण्याला सोडून सोलापूरकडे परतत असताना रुग्णवाहिकेची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सिमेंटच्या कंटेनरला धडक बसल्याने झालेल्या अपघातात चालकासह तीन जण जागीच ठार तर ुइतर सात जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोलापूर-पुणे महामार्गावरील लांबोटीजवळील (ता. मोहोळ) वीज वितरण उपकेंद्राजवळ सोमवारी पहाटे ६.३० वा. घडला. मृतांपैकी दोघे पुण्याचे आहेत. रुग्णवाहिका चालक महेश श्रीरंग उकरंडे (वय २७, रा. सोलापूर), कलाबाई सुरेश पवार (५०, स्वारगेट, पुणे) व महादेव सिद्धाप्पा फिरंगे (५५, रा. पुणे) अशी मृतांची नावे आहेत. उकरंडे हा सोलापूर येथील रुग्णाला सोडण्यासाठी रविवारी रुग्णवाहिका (एमएच-४५-९००२) घेऊन पुण्याला गेला होता. तो परतत असताना प्रवासी घेतले. रुग्णवाहिका लांबोटीजवळ (ता. मोहोळ) आली असता चालक झोपेच्या भरात असताना वीज वितरण उपकेंद्राजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त कंटेनरला (एमएच०-एनएल०१-के-५८६१) धडकली. यात चालकासह तिघे जागीच ठार झाले. अपघातात दशरथ सुरेश पवार (३५), शारदा दशरथ पवार (३०), दीपा दशरथ पवार (४), संजना दशरथ पवार (३), ऐचीबाई सुरेश पवार (१४), सुरेश गणपत काळे (२५), मकाबाई रमेश काळे (४०, रा. सर्व पुणे) हे जखमी झाले. पहाटे अपघाताची माहिती मिळताच महामार्गावरील रुग्णवाहिकेने जखमींना तातडीने सोलापूरच्या शासकीय दवाखान्यात दाखल केले. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात नोंद झाली असून तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.