रुप की रानी चोरों का राजा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 12:37 PM2019-05-06T12:37:41+5:302019-05-06T12:37:46+5:30

समाधान हाच खरा पैसा, हीच खरी श्रीमंती, हेच खरे भाग्य व हेच खरे ऐश्वर्य होय.

King of the Thieves! | रुप की रानी चोरों का राजा !

रुप की रानी चोरों का राजा !

Next

ही एक अनोखी प्रेम कहाणी. त्याचे वडील आॅफिसला आले होेते. त्याच्या मुलाला पोलिसांनी अटक करुन नेले होते़ त्यास का अटक केली, याबद्दल त्याला काहीही माहिती नव्हते. दुपारी कोर्टात या, त्यावेळी तुमच्या मुलाला पोलीस कोर्टात हजर करतील, यावेळी आपल्याला समजेल की, का त्यास अटक केली. दुपारी कोर्टात त्याच्या मुलाला हजर केले. फिर्यादीच्या मुलीला त्याच्या मुलाने पळवून नेल्याचा आरोप होता. ती मुलगी १६ वर्षांची होती. काय प्रकार आहे असे त्यास वारंवार विचारले असता तो गप्प बसत होता. काहीही सांगण्यास तयार नव्हता. त्याचा जामीन अर्ज सेशन्स कोर्टात दाखल केला. त्यावेळी अशा गुन्ह्याबद्दलचा कायदा आजच्या इतका कडक नव्हता. सध्या अशा खटल्यात पोस्को कायदा लावला जातो. त्यामुळे जामीन मिळणे जवळ जवळ अशक्य झाले आहे. पूर्वी आरोपीस अशा खटल्यात शक्यतो जामीन मिळायचाच. यथावकाश आरोपीची जामिनावर मुक्तता झाली. जामिनावर सुटल्यानंतर अतिशय देखणा असलेला तो आरोपी मला भेटायला आॅफिसला आला. अतिशय प्रामाणिक होता तो. त्याने स्पष्टपणे सांगितले की, तो एक पाकीटमार आहे. ती मुलगी त्याच्या घराजवळ राहत होती. हा सायकलवरुन जाताना त्यांची नजरा-नजर होत होती. प्रत्येक वेळी तो त्या रस्त्यावरुन जाताना ती गॅलरीमध्ये उभी राहत होती.

एके दिवशी तो जात असताना तिने गॅलरीतून गुलाबाचे फुल खाली टाकले. प्रेमप्रकरणास सुरुवात झाली. हुतात्मा बागेत ते बहरत गेले. एके दिवशी गल्लीतील पोरगा बागेत आला होता. त्याने दोघांना पाहिले. तिच्या घरच्यांना त्याने ताबडतोब जाऊन सांगितले. तिच्यावर बंधन आले. तिचे गॅलरीमध्ये उभे राहणे बंद झाले. एके दिवशी भल्या पहाटे ती त्याच्या घराजवळ आली. दोघांनीही क्षणाचाही विलंब न करता बॉबी स्टाईल धूम ठोकली. सुमारे महिनाभर दोघेही बाहेरच होते. पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी अत्यंत परिश्रम करुन दोघांना शोधून काढले. सध्या मात्र प्रेमीयुगुलांना शोधणे फार सोपे झाले आहे. त्यांचा मोबाईल नंबर ट्रॅकवर लावल्यानंतर एक सेकंदात शोध लागतो आणि लगेच त्या प्रेमीयुगुलांना पकडले जाते.

सध्याच्या मोबाईल युगात प्रेमाची सुरुवात झटपट होते. सकाळी ओळख होते, मोबाईल नंबर घेतला जातो, लगेच मेसेजची सुरुवात होते. दुपारी मेसेज जातो आणि लगेच प्रेमप्रकरण सुरु होते आणि थोड्याच दिवसात मोबाईलची बॅटरी जशी डिस्चार्ज होते तसे प्रेमप्रकरण डिस्चार्ज होऊन जाते ! असो, तो एक अतिशय प्रामाणिक आहे याची मला खात्री झाली. त्याने, तो पाकीटमार आहे असे स्पष्टपणे सांगितले होते. तारखेस न चुकता यायचा. पाकिटमारांच्या दुनियेचे अंतरंग तो मला सांगत होता. कसे आम्ही पाकीट मारतो. नखामध्ये कसे ब्लेड ठेवतो. मी त्यास विचारले एखाद्याच्या खिशात पैसे आहेत ते तू कसे ओळखतो. त्याच्यावर त्याने आकाशाकडे बघितले व वंदन केले. मारलेल्या पाकिटातून पैसे काढून घेऊन महत्वाची कागदपत्रे पाकिटात घालून ज्याचे पाकीट मारले आहे त्यांच्याकडे तो पाठवत असे. 

यथावकाश खटल्याची सुनावणी सुरु झाली. तिच्या आईवडिलांनी त्याच्याविरुध्द साक्ष दिली. अत्यंत सौंदर्यवान असलेल्या तिने मात्र त्याच्या बाजूने साक्ष दिली. साक्ष देऊन घरी गेल्यानंतर आजपासून तू आम्हाला मेली असे सांगून घरच्यांनी तिची घरातून हकालपट्टी केली. ती तडक त्याच्या घरी आली. त्याच्या घरच्यांनी तिचा सून म्हणून स्वीकार केला. दुसºया दिवशी दोघेही मला भेटण्यासाठी आॅफिसला आले. मी तिला विचारले, हा पाकीटमार असून, तू त्याच्यावर कशी भाळली. ती लाजत म्हणाली, सर ये लोगोके पैसे चुराता है, ये मुझे मालूम था, लेकीन इन्होने तो मेरा दिलही चुराया था. मी त्याच्याकडे बघितलं तो म्हणाला, ये तो रुप की रानी है उसनेही मेरा दिल चुराया है! 

अनेक वर्षांनी तो मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यास आला होता. मी म्हणालो, मुलगा काय काम करतो. तो म्हणाला, माझाच वारसा पुढं चालवत आहे. मी म्हणालो म्हणजे? तो म्हणाला, पाकीट का और ये शादी भी मेरे शादी जैसीच! तो अत्यंत समाधानी जीवन जगत होता. जो नेहमी समाधानी असतो तोच खरा श्रीमंत असतो. समाधान हाच खरा पैसा, हीच खरी श्रीमंती, हेच खरे भाग्य व हेच खरे ऐश्वर्य होय. ज्याला समाधान जास्त तोच जास्त भाग्यवान आणि तो खरा भाग्यवान माझ्यासमोर बसलेला होता. जरी चोर असला तरी! ती लग्नपत्रिका म्हणजे ‘रुप की रानी चोरों का राजा’ चा जणू सिक्वेलच होता !


- अ‍ॅड. धनंजय माने 
(लेखक हे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत)

Web Title: King of the Thieves!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.