सोलापुरी वारकऱ्यांचं गुरुवारी रायगडावर किर्तन; दोन दिंड्यासोबत स्केटींगवरून शिवज्योतही!
By रवींद्र देशमुख | Published: May 29, 2023 03:02 PM2023-05-29T15:02:52+5:302023-05-29T15:03:27+5:30
रायगडावर 1674 साली राज्यभिषेक झाला त्यावेळी गडावर गायन - वादन , संत पूजन मोठ्या प्रमाणात झाले आहे, याची इतिहास साक्ष देत आहे.
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा रायगड येथे साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने 1 जून रोजी सोलापूरचे ह. भ. प. सुधाकर महाराज इंगळे यांचे कीर्तन होणार आहे, ही माहिती रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक शिवाजी भोसले यांनी दिली.
बुधवार दि.31 मे रोजी दु 12.00 वा. दोन वाहने संत मुक्ताई मंदिर येथून रायगडकडे रवाना होणार आहेत. शिवप्रेमी रोल स्केटिंगद्वारे मंगळवारी शिवज्योत तुळजापूर - सोलापूर ते रायगड राज्यभिषेक सोहळ्यासाठी घेऊन जाणार आहेत. तर गुरुवार दि.1 जून रोजी सायंकाळी 6.00 वा अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे.
शुक्रवार दि.2 जुन रोजी सकाळी 7.30 वा. रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिराकडे पालखी निघते त्यावेळी भव्य आणि दिव्य वारकरी दिंडी निघणार आहे. या दिंडी मध्ये वारकरी परंपरे प्रमाणे विविध पाऊल, फुगडी, वगैरे सादर केले जाणार आहे. ही दिंडी ज्योतीराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष) व ह भ प बळीराम जांभळे (राष्ट्रीय सचिव ) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराज यांचे अनेक वेळा कीर्तन श्रवण केले आहे. संत तुकाराम महाराज यांचे विचार घेऊन राज्यभिषेक सोहळ्यास आम्ही जात आहोत, असे इंगळे महाराज यांनी सांगितले.
रायगडावर 1674 साली राज्यभिषेक झाला त्यावेळी गडावर गायन - वादन , संत पूजन मोठ्या प्रमाणात झाले आहे, याची इतिहास साक्ष देत आहे. त्यामुळे यंदा कीर्तन व वारकरी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याला खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण मुख्य राज्याभिषेक होऊन 350 वर्ष झाले आहेत. त्यानंतर आता प्रथमच हा योग प्राप्त होत असल्याने ऐतीहासिक महत्त्व प्राप्त होत आहे.
जे वारकरी रायगडावर जाणार आहेत त्यांचेकडे वारकरी पोशाख असणे गरजेचे आहे. ज्यांना या कार्यक्रमाला उपस्थित रहावयाचे आहे, त्यांनी एक जून रोजी उपस्थित रहावे, असे आवाहन रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक शिवाजीभोसले व विठ्ठल मोलाणे यांनी केले आहे.