देवदर्शनाला निघालेल्या कीर्तनाकार अन आचा-याचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:21 AM2021-03-06T04:21:55+5:302021-03-06T04:21:55+5:30
करमाळा: भरधाव वेगाने येणा-या ट्रकची मोटारसायकलला समोरून धडक बसून एक किर्तनकार आणि एक आचारी या दोघांचा ...
करमाळा: भरधाव वेगाने येणा-या ट्रकची
मोटारसायकलला समोरून धडक बसून एक किर्तनकार आणि एक आचारी या दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतातील दोघेजण हे साडूभाऊ असून ते पंढरपूर येथे देवदर्शनाला निघाले होते.
३ मार्च रोजी दुपारी २.४५ वा.चे सुमारास अहमदनगर-सोलापूर महामार्गावर कामोणे फाटयाजवळ मांगी येथे हा अपघात झाला. या अपघातात कीर्तनकार बबन गणपत घोडके महाराज (६६, रा.दहीगावणे, ता.शेवगाव, जिल्हा अहमदनगर) आणि आचारी रमेश भाऊराव गाडेकर (वय ६४ वर्षे रा.सलाबतपूर, ता.नेवासा जि.अहमदनगर ) हे दोघेजण मरण पावले.
याबाबत ज्ञानेश्वर बबन घोडके (वय ३० वर्षे रा.दहीगावणे, ता.शेवगाव, जि.अहमदगनर) यांनी करमाळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी विजयरासन विरापथीरन (वय ५०, रा.१३ दुसरा रस्ता, गणेशपूरम, जि.नमक्कल, राज्य तामिळनाडू) याच्या विरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादी ज्ञानेश्वर घोडके यांचे वडील बबन गणपत घोडके आणि रमेश भाऊराव गाडेकर व हे दोघेजण नात्याने साडू होत. ते मोटारसायकल (एम.एच.१७ आर.१४०१) वरून पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराचे कळस आणि देवदर्शनासाठी निघाले होते. ते कामोणे फाट्यावर आले असता समोरून भरधाव वेगाने येणा-या मालट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात ते दोघेही खाली पडून गंभीर जखमी होवून जागीच मरण पावले.
करमाळा पोलिसांनी ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
--
०५ बबन घोडके