के.के. एक्सप्रेसच्या इंजिनला आग; घाटणे ग्रामस्थ धावले मदतीला
By Appasaheb.patil | Published: July 2, 2023 10:28 AM2023-07-02T10:28:53+5:302023-07-02T10:51:29+5:30
आग विझविण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी व घाटणे गावातील ग्रामस्थ मदतीला धावले.
सोलापूर : सोलापूरहून पुण्याकडे निघालेल्या के.के. एक्सप्रेसच्या इंजिनला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही. दरम्यान, आग विझविण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी व घाटणे गावातील ग्रामस्थ मदतीला धावले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोलापूर-पुणे दरम्यान, के.के. एक्सप्रेस सकाळी ७ ३० वाजण्याच्या सुमारास सोलापूर रेल्वे स्थानकावरून मार्गस्थ झाली. मोहोळ तालुक्यातील घाटणे परिसरात एक्सप्रेस पोहोचल्यानंतर रेल्वेच्या इंजिनच्या वरच्या बाजूवरून आगीचा धूर बाहेर पडत होता. याची कल्पना रेल्वेच्या चालकास मिळाल्यानंतर तात्काळ गाडी थांबविण्यात आली. त्यानंतर तातडीने आग विझविण्याचे काम सुरू झाले.
यावेळी ग्रामस्थांनीही मोठी मदत केली. सध्या ही एक्सप्रेस घाटणे गावाजवळच थांबून असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. रेल्वेची आपतकालीन यंत्रणा घटनास्थळावर दाखल झाली आहे. शिवाय रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळावर दाखल झाले आहेत.