तहानलेल्या हरणावर कुत्र्याचा हल्ला; बंकलगी येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 01:01 PM2019-03-06T13:01:32+5:302019-03-06T13:05:09+5:30
सोलापूर : पिण्याच्या पाण्याच्या आशेने पाण्याच्या टाकीजवळ आलेल्या हरिणावर तीन कुत्र्यांनी हल्ला चढवला. यात हरिण गंभीररित्या जखमी झाले. त्याचे ...
सोलापूर: पिण्याच्या पाण्याच्या आशेने पाण्याच्या टाकीजवळ आलेल्या हरिणावर तीन कुत्र्यांनी हल्ला चढवला. यात हरिण गंभीररित्या जखमी झाले. त्याचे शेपूटही तुटले. वन्यजीवप्रेमी,वनविभाग,अॅनिमल राहत संस्था या सर्वांच्या प्रयत्नांनी त्याच्यावर उपचार करून शनिवारी त्याला हरिणाच्या कळपाचा शोध घेऊन निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी येथे हा प्रकार घडला.
या घटनेची पार्श्वभूमी अशी की, २६ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास लक्ष्मण कोणदे (कारभारी) यांच्या शेतात तहानलेले एक हरिण पाण्याच्या शोधात टाकीजवळ आले. जवळच असलेल्या तीन कुत्र्यांनी त्या हरिणावर हल्ला केला. घोटभर पाणीही हरिणास पिता आले नाही. याचवेळी तेथे असलेल्या सिद्धाराम, नागनाथ कोणदे आणि शाळकरी मुलांनी मिळून कुत्र्याच्या तावडीतून हरिणास वाचवले.
गावातल्याच प्राणीमित्र यांना बोलावून घटनेची माहिती दिली. त्यांनी वन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. हरिण प्रवासात उपचारासाठी घेऊन जाताना घाबरुन जाऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर अॅनिमल राहत संस्थेचे डॉ.राकेश चित्तोड यांच्याशी चर्चा करून तत्काळ रुग्णवाहिकेला बोलावून घेण्यात आले. पुढील उपचार अॅनिमल राहतच्या टीमने केले. पुढील देखभालीसाठी प्राणीमित्र बहुउद्देशीय संस्था, बंकलगीचे मल्लिकार्जुन धुळखेडे यांच्याकडेच सोपविण्यात आले.
हरिणाचे शेपूट तुटलेले होते. वनविभागाचे अधिकारी निकेतन जाधव,वनरक्षक भुई आणि अॅनिमल राहतचे डॉ. राकेश चित्तोड, डॉ. जाधव, भीमाशंकर विजापुरे, डॉ. वर्षा पांचाळ, सुनील अरळीकट्टी यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि तीन दिवसांच्या उपचारानंतर अखेर शनिवारी त्या हरिणास सुखरुप त्याच्या कळपाचा शोध घेऊन तेथे सोडण्यात यश मिळाले. हरिणाचे प्राण वाचल्यामुळे गावकरी व प्राणीमित्र व वन्यजीव प्रेमींच्या चेहºयावर आनंद दिसून आला.