वाळूच्या गाड्या नेण्याला विरोध केल्याने महूदमध्ये दांपत्यावर चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:20 AM2021-03-20T04:20:31+5:302021-03-20T04:20:31+5:30
सांगोला : शेतातून वाळूच्या गाड्या नेण्यास विरोध केल्याच्या कारणावरुन चिडून जाऊन सात जणांनी एका दांपत्यास शिवीगाळ करुन मारहाण केली. ...
सांगोला : शेतातून वाळूच्या गाड्या नेण्यास विरोध केल्याच्या कारणावरुन चिडून जाऊन सात जणांनी एका दांपत्यास शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच चाकूने दंडावर आणि काठीने पाठीवर मारहाण करुन गंभीर जखमी केले.
मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास सांगोला तालुक्यात महूद येथे लवटेमळा याठिकाणी हा प्रकार घडला. दरम्यान या भांडणात शीतल पाटील या महिलेच्या गळ्यातील गंठण तुटून गहाळ झाले. म्हाकू सदाशिव पाटील व शीतल म्हाकू पाटील असे जखमी दांपत्याचे नाव आहे.
महूद येथे लवटे मळ्यातील म्हाकू पाटील व शीतल पाटील हे दांपत्य १६ मार्च रोजी दुपारी २ च्या सुमारास शेतातील कांद्याला पाणी देत होते. त्यांच्या शेजारी अजय बिरा घोडके याची शेती आहे. तोही त्याच्या शेतात पिकांना खत घालीत होता. म्हाकू पाटील यांच्या शेतात शेजारून कासाळ ओढा गेला आहे. त्यांनी अजय घोडके यास तुम्ही आमच्या शेतातून वाळूच्या गाड्या घेऊन जायचे नाही असे बजावले. चिडलेल्या अजय घोडके यांनी म्हाकू पाटील यांना शिवीगाळ दमदाटी करू लागला. त्यावेळी विकास पाटील, तानाजी पाटील , नाना घोडके, संजय घोडके, शिवाजी पाटील, जयश्री उर्फ रूपाली घोडके यांनी पती-पत्नीला शिवीगाळ दमदाटी करून हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागले. यावेळी संजय घोडके यांनी त्याच्या हातातील चाकूने म्हाकू पाटील यांच्या उजव्या दंडावर मारून जखमी केले. जयश्री घोडके हिने तिथेच पडलेली एक काठी उचलून पत्नी शीतल हिच्या पाठीवर व दोन्ही हातावर मारहाण केली. दरम्यान या भांडणात शीतल हिच्या गळ्यातील गंठण कुठेतरी पडून गहाळ झाले. याप्रकरणी म्हाकू सदाशिव पाटील यांनी सात जणांविरूध्द फिर्याद दिली आहे.