कोंढारचिंचोलीची शाळा वृक्षसंवर्धनामुळे बनली निसर्गरम्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:20 AM2021-04-05T04:20:01+5:302021-04-05T04:20:01+5:30
शाळेच्या इमारतीसमोर भव्य मैदान, सभोवताली हिरवीगार झाडे. त्यामुळे भर उन्हातही सुखद अनुभव येथील शाळा परिसरात विद्यार्थी, शिक्षक अन् ग्रामस्थांना ...
शाळेच्या इमारतीसमोर भव्य मैदान, सभोवताली हिरवीगार झाडे. त्यामुळे भर उन्हातही सुखद अनुभव येथील शाळा परिसरात विद्यार्थी, शिक्षक अन् ग्रामस्थांना अनुभवता येत आहे.
सध्या कोरोनामुळे विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद आहेत. त्यामुळे कोंढारचिंचोली शाळेतील विद्यार्थ्यांचेही येणे-जाणे बंद आहे. मात्र शाळेत येणाऱ्या शिक्षकांनी झाडांची चांगली जोपासना करत हरित शाळा असणारी ही ओळख कोरोना काळातही कायम ठेवली आहे.
एकूणच सद्यस्थितीत कोंढारचिंचोली जिल्हा परिषद शाळेचा परिसर हिरव्यागार झाडांमुळे निसर्गरम्य बनलेली आहे. त्यामुळे वन्यजीवांनाही शाळेतील वृक्षांच्या हिरवाईने आकर्षित केल्याचे दिसून येत आहे.
निसर्गरम्य, आयएसओ, आदर्श शाळा म्हणून जिल्ह्यात ओळख असलेली ही शाळा सुरू असताना या शाळेला भेट देण्यासाठी इतर ठिकाणचे शिक्षक, पालक तसेच विविध अधिकारी नेहमीच येतात. कोरोना काळातही शाळेचे सौंदर्य टिकवून ठेवत झाडांची जोपासना करतानाच अचानक आलेल्या वानर पाहुण्यांचीही काळजी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांचेही कौतुक होत आहे.
पाच वानरांनी केला आश्रय
सध्या पाच वानरांनी शाळा आवारातील झाडांचा आश्रय घेऊन तेथील मुक्काम वाढविला आहे. हिरव्यागार झाडांमुळे उन्हापासून बचाव होऊन सुखदपणा वाटत असल्याने ही वानरे तेथे रमली आहेत.
निसर्गप्रेमी शिक्षकांसह काही पालक त्या वानरांच्या खानपानाकडे विशेष लक्ष देत असल्याने वानरांचा तेथील मुक्काम वाढण्याची चिन्हे आहेत. विद्यार्थ्यांची शाळेतील ये-जा बंद असताना आता वानरांनी शाळेत ये-जा सुरू केल्याची चर्चा कोंढारचिंचोलीत रंगली आहे. शाळेच्या आवारात मुक्काम करणाऱ्या या वानरांचे कुतूहल कोंढारचिंचोलीत निर्माण झाले आहे.
फोटो
०४करमाळा-शाळा
ओळी
अनोळखी व्यक्ती कोंढारचिंचोलीतील शाळेसमोर गेल्यानंतर एखाद्या श्रीमंत व्यक्तीचा बंगला वाटतो, पण विद्यार्थ्यांनी वृक्षलागवड, संवर्धन केल्याने ही वनराई बहरल्याचे दिसून येते.
०४करमाळा०१
शाळा परिसरात असलेल्या वानरांना केळी देताना नितीन कांबळे.