कोंडीत शिवसेनेच्या दोन गटांतच होणार लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:17 AM2020-12-27T04:17:03+5:302020-12-27T04:17:03+5:30
तालुक्यातील कोंडी गावावर गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचा प्रभाव आहे. सुरुवातीला काही निवडणुका शिवसेनाविरोधात इतर पक्ष अशा झाल्या. मात्र मागील ...
तालुक्यातील कोंडी गावावर गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचा प्रभाव आहे. सुरुवातीला काही निवडणुका शिवसेनाविरोधात इतर पक्ष अशा झाल्या. मात्र मागील दोन निवडणुका शिवसेनाविरोधात शिवसेना अशा झाल्या. पुढील पंचवार्षिकसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बिनविरोधचा प्रस्ताव काही जुन्या मंडळींनी मांडला. त्यानुसार बैठकाही झाल्या, मात्र एकमत झाले नाही. त्यामुळे आता निवडणुकीसाठीची तयारी शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून सुरू आहे. उपजिल्हा प्रमुख विक्रांत काकडे यांच्यासोबत शिवसेनेचा एक गट, तर तालुकाप्रमुख शहाजी भोसले यांच्यासोबत दुसरा गट आहे. मागील निवडणूकही अशाच दोन गटांत झाली होती.
ही निवडणूकही शिवसेनेच्या दोन गटांतच होईल असे सांगण्यात आले.
-----सोसलयं म्हणून बिनविरोध
साखरेवाडी हे सात सदस्य असलेले गाव. माजी आमदार दिली माने व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे या दोघांचा गावावर प्रभाव. ग्रामपंचायत निवडणुकीत इरेला पेटलेला संघर्ष पाच वर्षे शमत नाही. लग्न समारंभ असो व इतर कार्यक्रमात गटबाजी राहते. शेतात कामाला येणारे मजूरही गटातच विभागलेले असतात असे गावकरी सांगतात. मात्र खूप सोसलय म्हणून साखरेवाडी बिनविरोध होण्यासाठी गावकऱ्यांचे एकमत झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
----शेवटचे प्रयत्न
- हिरजमध्ये काही जागांवर एकमत होत नाही. अर्ज भरल्यानंतर बिनविरोधसाठी बैठक होईल असे सांगण्यात आले.
- राळेरासमध्ये सात पैकी चार जागांवर एकमत झाले आहे मात्र सरपंच पदाचे आरक्षण पडेल या अपेक्षेने आरक्षित जागावर रस्सीखेच सुरू आहे.
- वाॅटर कपसाठी एकत्रित आलेल्या भागाईवाडीत दोन गट चुरशीने पॅनल तयार करीत आहेत. तिन्ही गावांत बिनविरोधसाठी शेवटच्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
-----