पंढरपुरातील एका परिसरातच आठ व्यक्तींना कोरानाची लागण; महापौर चाळ केली सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 09:25 AM2020-07-14T09:25:02+5:302020-07-14T09:25:53+5:30
५० वयोवृद्धांचे आज होणार रॅपिड अँटीजेन टेस्ट; कोरोना मुक्तीसाठी आरोग्य विभागाचे शर्तीचे प्रयत्न सुरूच
पंढरपूर : एका कुटुंबातील ५ तर दुसऱ्या कुटुंबातील ३ असे एकूण ८ रुग्ण शहरातील महापौर चाळ येथे सापडले आहेत. त्यामुळे हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. त्याचबरोबर पंढरपूर - कुर्डवाडी रोडवरील एका गावच्या सरपंचाला ही कोणाची लागण झाली आहे.
एकाच कुटुंबातील ज्यादा व्यक्तींना कोरानाची लागण झाल्याची माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गट विकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, डॉ. धनंजय सरोदे, उपमुख्यधिकारी सुनील वाळुजकर, आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे यांनी महापौर चाळ या ठिकाणी भेट दिली. त्या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक यांना या परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी दक्ष राहण्यास सांगितले. सर्वांनी घरात राहून आवश्यक असणारे साहित्य कोविड वॉरियर्स माध्यमातून मागून घ्यावे मागून घ्यावे अशा सूचना दिल्या.
तसेच प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी नगरपालिका प्रशासनाने महापौर चाळ परिसर सर्व बाजूने सील करावा. तसेच या परिसरातील वयोवृद्ध लोकांचे विलगीकरण करा. त्यांना एका विशिष्ट ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण करा अशा सूचना दिल्या.
वयोवृद्धांचे आज रॅपिड अँटीजेन टेस्ट
महापौर चाळ परिसरातील वयोवृद्ध लोकांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. या सर्व वयोवृद्ध लोकांना विलगीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्या सर्व लोकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट एकाच दिवशी होणार आहे.