पंढरपूर तालुक्यात २०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:27 AM2021-04-30T04:27:52+5:302021-04-30T04:27:52+5:30
पंढरपूर : वसंतदादा काळे प्रतिष्ठानमार्फत पंढरपूरमध्ये वेदांत भक्त निवास येथे १०० बेड आणि वाडीकूरोली येथे ग्रामपंचायत ...
पंढरपूर : वसंतदादा काळे प्रतिष्ठानमार्फत पंढरपूरमध्ये वेदांत भक्त निवास येथे १०० बेड आणि वाडीकूरोली येथे ग्रामपंचायत स्तरावर १०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. परवानगी मिळताच शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करणार असल्याचे सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सांगितले.
पंढरपूर येथे जनकल्याण हॉस्पिटल गेल्या दहा महिन्यांपासून कोविड हॉस्पिटल केले आहे. या केंद्रातून हजारो रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तेथे ४५ बेड उपलब्ध आहेत. मात्र रुग्णसंख्या वाढली असल्याने बेड उपलब्ध होत नाहीत. आणखी बेड वाढविण्यासाठी विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीचे वेदांत भक्त निवास पंढरपूर येथे १०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून प्रस्ताव दिला आहे. परवानगी मिळताच तेथे १०० बेडचे व वाडीकूरोली येथे १०० बेडचे असे २०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करणार असल्याचे सांगितले आहे.
गजानन महाराज मठ येथील कोविड सेंटरमध्येही जागा शिल्लक नाही. रुग्णसंख्या दररोज झपाट्याने वाढत असल्याने ऑक्सिजन बेड आणि प्राथमिक उपचारासाठीसुद्धा फिरावे लागत आहे. कोविड केअर सेंटर सुरू झाल्याने प्राथमिक स्तरावर उपचाराची सोय होणार आहे. २०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू होणार असल्याने पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.