पिंपळनेरमध्यशे हजार बेडचे कोविड सेंटर उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:16 AM2021-06-20T04:16:29+5:302021-06-20T04:16:29+5:30
कुर्डूवाडी : तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने पिंपळनेर येथे एक हजार बेडचे ऑक्सिजन व ...
कुर्डूवाडी : तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने पिंपळनेर येथे एक हजार बेडचे ऑक्सिजन व सुसज्ज सुविधायुक्त असे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी दिली.
कुर्डूवाडी पंचायत समितीमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर व इतर विविध विषयांवर पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य व सर्व विभागांचे अधिकारी, आदींची संयुक्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभापती विक्रमसिंह शिंदे, माजी उपसभापती बंडूनाना ढवळे, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, उपअभियंता एस. जे. नाईकवाडी, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, कृषी अधिकारी संभाजी पवार, सहायक प्रशासन अधिकारी सयाजी बागल यांच्यासह पंचायत समितीचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले की, कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता एक हजार बेडचे कोविड केअर सेंटर उभे करण्यात येणार असून, यासाठी कारखान्यातील व पंचायत समितीतील संयुक्त कर्मचारी कामकाज पाहणार आहेत. तसेच माढा आलेगाव (बु), कुर्डूवाडी, माढा ग्रामीण रुग्णालयात व खासगी रुग्णालयामध्ये असे एकूण १०० ऑक्सिजन बेड सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
---