करकंब येथे दोन दिवसात कोविड सेंटर होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:23 AM2021-04-28T04:23:56+5:302021-04-28T04:23:56+5:30
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बधितांचा आकडा वाढत आहे. यामुळे शहरातील आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. शिवाय ...
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बधितांचा आकडा वाढत आहे. यामुळे शहरातील आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. शिवाय कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना बाधितांची गर्दी वाढत आहे. असे असताना कोरोना बाधित रूग्णांची गावातच प्राथमिक औषधोपचाराचे सोय झाल्यास नागरिक कोरोना आजार अंगावर न काढता कोरोना तपासणीसाठी पुढे येतील. या पार्श्वभूमीवर शासनाने ज्या गावची लोकसंख्या पाच हजारांच्यावर आहे अशा गावात कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला.
या अनुषंगाने तहसीलदार सुशील बेलेकर यांनी करकंब येथे नव्याने कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी येथील झेडपी शाळा मुली नं. २ च्या जागेची पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक नरसाप्पा देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, सपोनि प्रशांत पाटील, प्रा. सतीश देशमुख, मंडल अधिकारी चंद्रकांत ढवळे, तलाठी रिंगण चव्हाण, विशाल देशमुख आदी उपस्थित होते.
नागरिकांमध्ये चुकीचा गैरसमज
ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांमध्ये मला रुग्णालयात जाण्याची गरज नाही, मला काही झाले नाही, मला रुग्णालयात पाठविले तर मी परत येऊ शकत नाही, अशा प्रकारे चुकीचा गैरसमज निर्माण झाल्याने रुग्णालयात उपचार घेण्याची मानसिकता दिसत नाही. नागरिक अनावश्यक भीतीपोटी तपासणी न करता आजार अंगावर काढत आहेत. त्याचा संसर्ग कुटुंबाला होऊन रुग्ण वाढताना दिसत आहेत. आता गावातच कोरोना रुग्णांची सोय होणार असल्याने अनावश्यक भीती आणि चुकीचा गैरसमज दूर होण्यासाठी फायदा होणार आहे.
कोट :::::::::::::::::
कोरोना रुग्णांसाठी गावात कोविड केअर सेंटर सुरू झाल्यामुळे रूग्णांचे मानसिक संतुलन व्यवस्थित राहण्यास मदत होऊन त्याचा फायदा रुग्ण लवकर बरा होण्यासाठी होणार आहे.
- प्रा. सतीश देशमुख
ग्रामपंचायत सदस्य, करकंब
कोट ::::::::::::::::::::::
येथील कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून बाधित रूग्णांना प्रथमोपचार मिळणार आहेत. नागरिकांनी तपासणी करून घेतल्यास कुटुंबातील इतर व्यक्तींना कोरोनाची बाधा होणार नाही आणि रुग्ण संख्येत लवकर घट येईल.
- सुशील बेल्हेकर
तहसीलदार
कोट ::::::::::::::::::
करकंबमध्ये कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून येथील कोरोना बाधितांना सोयीचे होणार आहे. आम्ही स्थानिक डॉक्टरांशी चर्चा करून आमचे कशा पद्धतीने योगदान देता येईल, याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ.
- डॉ. प्रशांतकुमार मोरे
अध्यक्ष, डॉक्टर असोसिएशन करकंब