पंढरपूर तालुक्यात सात केंद्रांतून कोवीड लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:21 AM2021-02-12T04:21:10+5:302021-02-12T04:21:10+5:30
पंढरपूर : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पंढरपूर तालुक्यात १२ फेब्रुवारी पासून शहरासह ग्रामीण भागातही लसीकरण मोहीम सुरु करण्यात येणार आहे. ...
पंढरपूर : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पंढरपूर तालुक्यात १२ फेब्रुवारी पासून शहरासह ग्रामीण भागातही लसीकरण मोहीम सुरु करण्यात येणार आहे. कोवीन ॲपवर नोंदणी केलेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच सरकारी, खाजगी रुग्णालयातील आरोग्य सेवा देणा-या संबंधित कर्मचारी यांच्या लसीकरणासाठी तालुक्यात सात लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहेत. तालुक्यात आतापर्यत १ हजार ६०० जणांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी दिली.
कोविड लसीकरण मोहिमेबाबत सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस तहसीलदार विवेक साळुंखे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ अरविंद गिराम, पोलीस निरिक्षक प्रशांत भस्मे, सहायक गटविकास अधिकारी पिसे यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कोविन ॲपवरील नोंदणी व्यतिरिक्त इतर कोणात्याही व्यक्तीला लस दिली जाणार नाही. मधुमेह, उच्च रक्तदाब, इतर दुर्धर आजार तसेच गरोदर माता, स्तनदा माता यांनी आपली माहिती कोवीन ॲपवर देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
---
पहिल्या टप्पयात शासकीय कर्मचारी
कोविन ॲपवर नोंदणी केलेल्या तालुक्यातील सरकारी, खाजगी रुग्णालयातील आरोग्य सेवा देणा-या संबंधित कर्मचारी तसेच महसूल, पोलीस, नगरपालिका, पंचायत समिती येथील फ्रंटलाईन कर्मचारी यांच्यासाठी शहरासह ग्रामीण भागात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी शहरात उपजिल्हा रुग्णालय येथील संसर्गजन्य रुग्णालय पंढरपूर, गॅलक्सी हॉस्पीटल, ॲपेक्स हॉस्पीटल, विठ्ठल हॉस्पीटल तसेच ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र कासेगांव, ग्रामीण रुग्णालय करकंब व प्राथमिक आरोग्य केंद्र गादेगांव येथे लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहेत.
----
फोटो : ११ पंढरपूर
पंढरपूर तालुक्यात शुक्रवारपासून कोवीड लसीकरणाला सुरुवात होत आहे. यापार्श्वभूमीवर माहिती देताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले