सोलापूरातील कुमठे मलनिस्सारण केंद्र होणार कार्यान्वित, आयुक्त अविनाश ढाकणे यांनी घातले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:14 PM2017-11-22T12:14:41+5:302017-11-22T12:17:32+5:30
नोव्हेंबर संपत आला तरी जुळे सोलापुरातील ड्रेनेज जोडणी रखडल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत असल्याने आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी लक्ष घातल्यावर कुमठे मलनिस्सारण केंद्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २२ : नोव्हेंबर संपत आला तरी जुळे सोलापुरातील ड्रेनेज जोडणी रखडल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत असल्याने आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी लक्ष घातल्यावर कुमठे मलनिस्सारण केंद्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहर हागणदारीमुक्त होण्यासाठी मनपा प्रशासनातर्फे मोहीम हाती घेण्यात आली. मोहिमेला चांगले यश आले. पण प्रतापनगर व कुमठे येथील मलनिस्सारण केंद्राचे काम रखडल्याने विजापूर रोड, जुळे सोलापूर आणि होटगी रोड परिसरातील नागरिक समस्याने ग्रासल्याबाबत आयुक्तांकडे पाठपुरावा करण्यात आला. जुळे सोलापूर परिसरात नव्याने झालेल्या वसाहतीत अनेकांकडे ड्रेनेजसाठी शोषखड्डे आहेत. हे खड्डे भरू लागल्याने वापराचे पाणी मोकळ्या जागेत सोडले जाते. यामुळे अनेक ठिकाणी उघड्या गटारी व डबके तयार झाल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे या भागात डेंग्यू, मलेरिया साथींचा प्रभाव जादा दिसून येत आहे. ड्रेनेज योजना मार्गी लागल्यास नागरिकांच्या सांडपाण्याचा प्रश्न सुटणार आहे. कुमठे मलनिस्सारण ड्रेनेजलाईनचे काम अडले आहे. वीज जोडणी पूर्ण करून केंद्राची चाचणी घेण्यात आली. त्यामुळे ज्या भागात काम पूर्ण झाले आहे, तेथील ड्रेनेज जोडणीला परवानगी दिली जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली
जुळे सोलापुरात प्रॉपर्टी जोडणीचे काम मंदगतीने सुरू आहे. हे काम वेगाने पूर्ण करण्याबाबत आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी गेल्या महिन्यात लक्ष घातले होते. आॅक्टोबरअखेर ही योजना कार्यान्वित करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले होते. पण अडचणीमुळे काम लांबले. ७0 फूट रोडवर प्रॉपर्टी जोडणीसाठी नवा रस्ता खोदण्यात आला पण हे खड्डे पूर्ववत करण्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. काम होऊन महिना लोटला तरी खड्डे जैसे थे आहेत. यातून जाणाºया वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे बुजविण्याची जबाबदारी कोणाची हे तपासले जाईल असे आयुक्त डॉ. ढाकणे यांनी सांगितले.
---------------------
काम लवकर संपवा
प्रतापनगर मलनिस्सारण केंद्रातील पाणी सोडण्याचे अडलेले काम लवकर संपविण्याच्या सूचना दिल्याचे आयुक्त डॉ. ढाकणे यांनी सांगितले. हे काम झाले की नागरिकांना ड्रेनेज जोडणीस परवानगी दिली जाईल. अद्याप पॉपर्टी जोडणीचे मोठे काम राहिल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या भागात खोदलेले रस्ते व प्रॉपर्टी जोडणीचे काम स्वत: पाहणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.