कुणबी मराठा नोंदी आढळल्या, मात्र वारसांना प्रमाणपत्र मिळेनात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 02:23 PM2024-03-04T14:23:46+5:302024-03-04T14:24:39+5:30
१६ नोंदी आढळल्या : होनसळ-राळेरासच्या नागरिकांचे केवळ हेलपाटे
सोलापूर - नोव्हेंबर महिन्यात तपासणी केलेल्या ३९ हजार ९५२ जन्म - मृत्यू नोंदीत आढळलेल्या कुणबी मराठा कुटुंबांच्या एकाही वारसाला प्रमाणपत्र मिळालेले नाही. उत्तर तालुक्यातील होनसळ व राळेरास येथील १६ व्यक्तींच्या नोंदी कुणबी मराठा आढळल्या होत्या.
राज्यात जशी जुनी शेती, जागा खरेदीखत, जन्म मृत्यू नोंदी, शाळेचे दाखले आदींची तपासणी करण्यात आली तशी उत्तर सोलापूर तालुक्यातही केली होती. जन्म मृत्युच्या नोंदीत होनसळ येथे एक व राळेरास येथील १५ अशा १६ व्यक्तींच्या नोंदी कुणबी मराठा आढळल्या होत्या. यापैकी एकाही कुटुंबातील वारसांना कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यात आले नाही. आमच्या कुटुंबातील मुरलीधर बापू डांगे व पांडुरंग बापू डांगे यांची मराठा कुणबी अशी नोंद आहे. या दोघांचीही लग्न झाली नव्हती, त्यांना आप्पा मारुती डांगे व मारुती बापू डांगे हे सख्ख्ये भाऊ होते. मारुतीची आम्ही मुले आहोत. कुटुंबात कुणबी नोंद असल्याने प्रमाणपत्रांसाठी तहसील कार्यालयात चौकशी करीत आहोत. मात्र, काहीच उत्तर मिळत नाही.
- नेताजी मारुती डांगे, राळेरास, उत्तर सोलापूर
गावात जगताप, पाटील, जोगदंड, गुंड, डांगे व इतर आडनावाच्या समोर कुणबी नोंदी आहेत. यापैकी डांगे यांचे वारस गावात आहेत. मात्र, त्यांनाही दाखला दिला जात नाही. इतर कुटुंबाचे वारस गावात आढळून येत नाहीत. नावे व्यवस्थित दिसत नाहीत. तहसील कार्यालयात कुणबी मराठा नोंदीबाबत दखल घेतली जात नाही.
नागनाथ मान
सरपंच, राळेरास, उत्तर सोलापूर