कुर्डू, लऊळमध्ये सत्ताधारी गटाला आत्मविश्वास नडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:23 AM2021-01-20T04:23:10+5:302021-01-20T04:23:10+5:30
कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील कुर्डू व लऊळ या दोन ग्रामपंचायती आर्थिक, सामजिक, राजकीय, शैक्षणिक व क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठ्या आहेत. ...
कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील कुर्डू व लऊळ या दोन ग्रामपंचायती आर्थिक, सामजिक, राजकीय, शैक्षणिक व क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठ्या आहेत. ग्रामपंचायत सदस्य संख्या १७ आहे. दोन्ही गावातील सत्ताधा-यांना स्वतःविषयीचा अतिआत्मविश्वास नडला. परिणामत: सत्ताधा-यांना पराभव पत्करावा लागला.
दोन्ही गावात सत्तेचे परिवर्तन होऊन आमदार शिंदे गटाची सत्ता प्रस्थापित झाली आहे. कुर्डू ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी सरपंच संघटनेचे अध्यक्ष जयंत पाटील व माजी उपसरपंच संदीप पाटील यांच्या शांतता ग्रामविकास आघाडीच्या विरोधात थेट माजी सरपंच आण्णासाहेब ढाणे यांच्या नागनाथ ग्रामविकास आघाडीत लढत झाली. पतसंस्था व्यवहार आणि व्यापक कामामुळे गावच्या राजकारणात जयंत पाटील यांचा संपर्क कमी झाला. सत्ताधारी गटाला मतदारांनी फटकारले. दुसरीकडे वस्ताद ढाणे यांनी मागील ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभव पचवत पाच वर्षात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीत मदत केली. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक पोषक वातावरणात पार पडली. परिणामत: १७ पैकी १६ जागेवर विजय मिळविला. कुर्डूतून आण्णासाहेब ढाणे गटाच्या सुप्रिया कापरे, उषा नरखेडकर, उमेश पाटील, सविता अनंतकवळस, कुंताबाई चोपडे, सुधीर लोंढे, पद्मिनी माळी, अर्चना जगताप, धनंजय गोरे, वंदना भोसले, महावीर गायकवाड, नितीन गोरे, लतिका जगताप, आण्णासाहेब ढाणे, सोजर माळी, रसिका जगताप हे १६ उमेदवार निवडून आले.
जयंत पाटील यांच्या गटाचा अमोल गायकवाड एकमेव उमेदवार निवडून आले. लऊळ येथे दरलिंग ग्रामविकास आघाडीविरुद्ध सत्ताधारी स्वाभिमानी ग्रामविकास आघाडीत चुरशीची लढत झाली. सत्ताधारी गटाला आपणच सत्तेत येणार हा आत्मविश्वास नडला. दरलिंग गटाचे प्रमुख प्रतापराव नलवडे यांच्यावर विश्वास दाखवत मतदारांनी त्यांच्या गटाला १७ पैकी १० जागेवर विजय प्राप्त करून दिला आहे. सत्ताधारी गटाला फक्त सहा जागांवरच समाधान मानावे लागले. सिद्धेश्वर गटालाही १ जागेवर विजय मिळविता आला आहे. येथील दरलिंग ग्राम विकास आघाडीचे उमेदवार महेश बागल, संजय लोकरे, पूजा बोडके, यशश्री गांधले, अश्विनी भोंग, कल्याण गाडे, सत्यभामा लोकरे, लक्ष्मण भोंग, मनीषा गवळी, दीपाली मांदे हे उमेदवार विजयी झाले. सिध्देश्वर ग्रामविकास आघाडीच्या शांताबाई घुगे या एकमेव उमेदवार विजयी झाल्या आहेत. सत्ताधारी स्वाभिमानी ग्रामविकास आघाडीचे प्रियंका कांबळे, नामदेव भोंग, सावित्रा गणगे, निर्मला नलवडे, खंडू भोंग, रुपाली जानराव असे सहा उमेदवार विजयी झाले आहेत.